महापुरामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगित : शरद पवार यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:20 PM2019-08-08T18:20:34+5:302019-08-08T18:29:40+5:30
राज्यात इतकी भीषण महापुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची शिवस्वराज्य यात्रा स्थगित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिली.
पुणे : राज्यात इतकी भीषण महापुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची शिवस्वराज्य यात्रा स्थगित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिली.
पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे, महापालिका गटनेता दिलीप बराटे उपस्थित होते.गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे मोठे स्वरूप समोर आल्यावर सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्ष पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच संदर्भात पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही दुष्काळी भागातून जात होती. त्यात सध्या महापूर आलेल्या कोणत्याही भागाचा समावेश नाही. मात्र राज्यात आलेले संकट बघून आम्ही यात्रा स्थगित करत आहोत. सध्या कार्यकर्त्यांची ऊर्जा ही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लागणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी त्यांचे एका महिन्याचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहे. सध्या कोणत्याही विश्लेषणाची गरज नसून सांगली, कोल्हापूरच्या जनतेला मदत करण्याची गरज आहे.
त्यांनी यावेळी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- पुराच्या तडाख्याने पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान सोसत आलेल्या सांगली, कोल्हापूर भागातील सर्व शेतकऱ्यांना सरकारने १०० टक्के कर्जमाफी द्यावी.
- एनडीआरएफ सारखी यंत्रणा राज्य सरकारने उभी करणे गरजेचे आहे.
- 2005पेक्षा यावेळी परिस्थिती गंभीर आहे. यंदा चित्र अधिक गंभीर आहे.
- कोल्हापूर आणि सांगली हा राज्यासाठी महत्वाचा भाग आहे. इथून संपूर्ण राज्यात सर्वाधिक दुधाचा पुरवठा होता.
- या भागात चहुबाजूंनी नुकसान झाले आहे. अशी स्थिती माझ्या पाहण्यात आलेली नाही. यावेळी पूराची व्याप्ती मोठी आहे. अभूतपूर्व नुकसानाला राज्य तोंड देत आहे.
- सरकारने पाणी आटल्यावर ताबडतोब पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी.