NCP SP Jayant Patil Pune Metro Travel News: मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळते. दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढतच जाताना पाहायला मिळत आहे. अनेक पूल बांधून, मेट्रो सुरू करूनही काही भागांत वाहतूक कोंडी तसूभरही कमी होताना पाहायला मिळत नाही. याच वाहतूक कोंडीचा फटका अनेक नेत्यांनाही बसतो. अनेक नेते यावर जाहीर भाष्यही करतात. याच वाहतूक कोंडीचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनीही घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी वाहतूक कोंडीला कंटाळून आपले वाहन सोडले आणि सरळ मेट्रोची वाट धरली. आमदार बापूसाहेब पठारे यांच्या चिरंजीवाच्या लग्न सोहळ्यासाठी जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली. खराडी या ठिकाणी कार्यक्रम होता. वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटील यांनी सरळ जवळचे मेट्रो स्थानक गाठले आणि मेट्रोने प्रवास केला.
पुणे नगर रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सामान्य नागरिकांनाही सहन करावा लागतो. काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासन् तासाचा वेळ खर्च करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे जयंत पाटील यांनीही आपले वाहन सोडून मेट्रोने प्रवास करणे पसंत केले.