पुणे: मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी २६ दिवस कोठडीत काढल्यानंतर अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) जामिनावर सुटका करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खानला आर्थर रोड कारागृहातून शनिवारी सोडण्यात आले. यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोपास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आर्यन खान प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून, जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय, असा सवाल केला आहे.
पुण्यातील कात्रजमध्ये झालेल्या नोकरी महोत्सवानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांना आर्यन खान २६ दिवसानंतर बाहेर आल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी एक आई म्हणून सुरुवातीला उत्तर देऊ इच्छित असून नंतर लोकप्रतिनिधी म्हणून बोलते. एक आई म्हणून कुठल्याही आईला हा विषय दुःखाचा विषय आहे. कोणत्याही कुटुंबात हे झाले असते, तर दुर्दैवाची गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे
त्या मुलाकडे काहीच मिळाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय? त्यामुळे समाज म्हणून आपण सर्वांनी चिंतन केले पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. शाहरूख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारले जाते. अशा चुकीच्या गोष्टीमुळे बॉलीवूडचे आणि देशाचे नाव एखादा अधिकारी चुकीचे काम करीत असल्यास जगभरात बदनाम होते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केले, पण महापौरांकडून चांगले काम झाले नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल. अजितदादांकडून काम करुन घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरु करा, असे आदेशच सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले.