Ambegaon Vidhan Sabha 2024: आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; शरद पवारांच्या भाषणाचा प्रभाव पडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 04:00 PM2024-11-22T16:00:42+5:302024-11-22T16:02:31+5:30

वळसे-पाटील समर्थक ७५ हजारांच्या मताधिक्याने विजयाचा दावा करत आहेत. तर निकम समर्थक पंधरा ते वीस हजार मतांच्या फरकाने विजय होऊ, असे सांगत आहेत

NCP vs NCP in Ambegaon Assembly Will Sharad Pawar speech have an impact | Ambegaon Vidhan Sabha 2024: आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; शरद पवारांच्या भाषणाचा प्रभाव पडणार का?

Ambegaon Vidhan Sabha 2024: आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; शरद पवारांच्या भाषणाचा प्रभाव पडणार का?

मंचर : आंबेगाव विधानसभेमध्ये डिंभे बोगदा आणि निष्ठा हे दोन मुद्दे प्रचंड प्रमाणात गाजले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. त्यामुळे हे दोन मुद्दे कोणाला तारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागे आहे. दरम्यान, विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा तीन टक्के मतदान वाढले आहे. दुसरीकडे मंचर येथील सभेत शरद पवारांच्या भाषणाचाही प्रभाव काही ठिकाणी दिसून येत आहे.

आंबेगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी ७०.४९ टक्के मतदान झाले आहे. तीन लाख १४ हजार २५२ मतदारांपैकी दोन लाख २१ हजार ५११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मागील पंचवार्षिकला ६६.८७ टक्के मतदान झाले होते. यावर्षी मतदानाचा टक्का वाढला असून ३.१४ टक्के जास्त मतदान झाले आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. महायुतीचे दिलीप वळसे-पाटील व महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांच्यामध्ये सरळ-सरळ लढत झाली आहे. इतर पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसते. डिंभे धरणातील बोगदा व निष्ठा या दोन प्रमुख बाबी प्रचारात चर्चेला गेल्या होत्या. वळसे-पाटील अष्टविजय साजरा करतात की, देवदत्त निकम पहिल्याच प्रयत्नात बाजी मारतात, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी आमच्याच फायद्याची आहे, असे दोन्हीकडून सांगितले जाते. वळसे-पाटील समर्थक ७५ हजारांच्या मताधिक्याने विजयाचा दावा करतात. तर निकम समर्थक पंधरा ते वीस हजार मतांच्या फरकाने विजय होऊ, असे सांगत आहेत.

तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर पश्चिम आदिवासी पट्टामधील घोडेगाव, मंचर परिसर, सातगाव पठार, पूर्व भाग व शिरूर तालुक्यातील ४२ गावे असा हा मतदारसंघ विस्तारला आहे. मागील सातवेळा वळसे-पाटील चढत्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यावेळेस त्यांना शिष्याकडूनच आव्हान मिळाले आहे. खासदार शरद पवार यांनी वळसे-पाटील यांना पराभूत करा, असे आवाहन मंचर येथील प्रचारसभेत केले आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. वळसे-पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत पूर्वा वळसे-पाटील यांनी भावनिक भाषण केले तेही अनेकांना भावले गेले. त्यामुळे नक्की मतदारांनी काय केले, याचा थांगपत्ता लागत नाही. उमेदवारांच्या गावातसुद्धा मतदानाची टक्केवारी चांगली आहे.

महिलांचे मतदान लक्षणीय

वळसे-पाटील यांच्या निरगुडसर गावात ७६.३७ टक्के मतदान झाले आहे. तर निकम यांच्या नागापूर गावात ८१.५५ टक्के मतदान झाले आहे. ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावात ६९.६८ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत महिलांनी उत्साहाने मतदान केले आहे. एक लाख ५४ हजार ७७३ मतदानापैकी एक लाख चार हजार १७१ महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला असून त्यांच्या मतदानाची टक्केवारी ६७.३० टक्के एवढी आहे. राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती. प्रत्येक महिलेला दर महिना पंधराशे रुपये महायुती सरकारने सुरू केले होते. ही रक्कम वाढवून दोन हजार १०० रुपये करणार आहेत. त्यामुळे महिलांच्या मतदानाचा फायदा महायुती सरकारला होतो की नाही यावर बऱ्याच अंशी निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

Web Title: NCP vs NCP in Ambegaon Assembly Will Sharad Pawar speech have an impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.