वडगाव शेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; आजी - माजी आमदारांची दुरंगी लढत, प्रचारातूनच भवितव्य ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 04:32 PM2024-10-30T16:32:29+5:302024-10-30T16:34:03+5:30
टिंगरेंना पोर्शे अपघात प्रकरण नडणार की पठारे यांचे ऐनवेळी पक्षांतर करणे त्यांना त्रासदायक ठरणार
पुणे : पुण्याच्या वडगाव शेरी मतदार मतदार संघातून अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरु होती. अखेर मुळीक यांनी माघार घेतल्यानंतर टिंगरेंचा रस्ता मोकळा झाला. आता या मतदार संघातून अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे बापू पठारे अशी मुख्य लढत होणार आहे.
वडगाव शेरीत बंडखोरी होणार अशी चर्चा होती; पण काहीच झाले नाही, असा हा मतदारसंघ. उमेदवारी मिळणार नाही, पण मिळाली तोही हाच मतदारसंघ. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रथा निर्माण करणारा देखील हाच मतदारसंघ. २०२४ च्या निवडणुकीत ही सर्व वैशिष्ट्ये कायम आहेत. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक बंडखोरी करणार अशी अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा होती, पण तसे काहीही झाले नाही. महायुतीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवारी देणार नाहीत अशी अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा होती, पण तसे काहीही झाले नाही, टिंगरे यांनाच उमेदवारी मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी दुसऱ्या पक्षातून येतील अशी चर्चा होती, ती मात्र खरी ठरली. माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. आता रिंगणार टिंगरे व पठारे असे दोन आजी-माजी आमदार हेच प्रमुख उमेदवार आहेत. त्यांच्यात लढत होईल. टिंगरे यांना पोर्शे कार अपघात प्रकरण नडणार की त्यांनी केलेली विकासकामे त्यांना तारणार?, पठारे यांनी आमदार असताना मतदारसंघात केलेली कामे त्यांना विजय मिळवून देतील की ऐनवेळी पक्षांतर करणे त्यांना त्रासदायक ठरेल, हे आता प्रचाराच्या वाऱ्यामधून समजेल.
पुण्यातील या मतदार संघात शरद पवार यांच्याविरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार आहे. समोर कोणीही उभा असो आम्हाला काही घेणेदेणे नाही. आम्हाला वडगाव शेरीच्या विकाकासाठी आमदार व्हायचंय असा विश्वास पठारे यांनी व्यक्त केला आहे. तर विकासाच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढवतोय असं टिंगरेंनी सांगितलं आहे. अखेर मतदार कोणाला साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.