पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२ साठीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आपण ज्या प्रभाग आरक्षणांची वाट पाहात होतो, ते आरक्षण मंगळवार, दि. ३१ मे २०२२ रोजी जाहीर झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक शाखेने पुणे महानगरपालिकेसह राज्यातील १४ महानगरपालिकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. या सोडतीचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराध्यक्ष या नात्याने स्वागत करतो.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य महापौरपदी विराजमान व्हावा, यासाठी मागील काही महिन्यांपासून आम्ही सर्व सहकारी व पदाधिकारी जिद्दीने कार्यरत आहोत. २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. त्यामुळे, या पाच वर्षांत काहीही ठोस कामगिरी करता न आलेला आणि आत्मविश्वास गमावलेला भाजप आमच्याविरोधात निवडणुकीत असणार आहे. या निवडणुकीत तमाम पुणेकरांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू शकू, असा विश्वास आहे.
प्रभागनिहाय जे आरक्षण जाहीर झाले आहेत, त्यानुसार सक्षम व ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे निश्चितच जड आहे. पक्षाचे उत्तम संघटन व आमचे मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे नेतृत्व यांमुळे या महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर विराजमान होईल, अशी ग्वाही मी शहराध्यक्ष या नात्याने देतो.