(सतीश सांगळे)
कळस : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेऊन पळ काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी वाढली असून, भाजपला उमेदवारी देताना कसोटी लागणार आहे.
राज्यातील महत्त्वाचा सहकारी साखर कारखाना व अनेक उपपदार्थ निर्मिती असलेल्या या कारखान्यात राष्ट्रवादीचे विद्यमान मंत्री व आमदार पक्षाचा असताना निवडणुकीतून माघारी घेणे धक्कादायक समजले जात आहे. माजी मंत्री पाटील यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील नेत्यांनी या निवडणुकीतून पळ काढला आहे.
पहिल्या फळीतील नेते निवडणूक लढविण्यास तयार नसल्याने हा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक मात्र कर्मयोगी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून का पळ काढला ? हा मोठा प्रश्न आहे. कर्मयोगी साखर कारखान्यात स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यानंतर माजी मंत्री पाटील यांनी कारखान्याची धुरा सांभाळली. कर्मयोगी साखर कारखान्याबरोबरच माजी मंत्री पाटील यांनी दुसरा सहकारी तत्वावरील नीरा भीमा कारखाना सुरू केला. त्या ठिकाणी मागील सहा महिन्यांत निवडणूक बिनविरोध पार पाडली. त्या ठिकाणीही राष्ट्रवादीने पळ काढला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कर्मयोगी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार, याची उत्सुकता सभासदांना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
कारखाना निवडणूक लढवली तरी कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल, अशी स्थिती नाही सहकार क्षेत्रातील अनुभवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत; मात्र जाणीवपूर्वक सदस्यत्व रद्द करून उमेदवारीपासून कायदेशिररीत्या दूर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अनुभव नसलेल्या उमेदवारांचा पॅनल उभा करून फक्त राजकारणासाठी राजकारण करणे आम्हाला योग्य वाटत नाही. कारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालविण्याचे साधन आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. याचा विचार करून सदर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:चे पॅनल उभे करणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतलेला आहे, असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिले आहे. नीरा भीमा साखर कारखान्यानंतर कर्मयोगी साखर कारखान्यात राष्ट्रवादीने पळ काढल्याने आगामी जिल्हा बँक, नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत त्याचा परिणाम होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीत अंतर्गत कलह कारणीभूत असल्याची चर्चा आहे.