पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल” या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते बालगंधर्व सभागृहात पार पडले. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भस्मराज तिकोणे (रा. कसबा पेठ, पुणे), प्रमोद कोंढरे ( रा. नातूबाग, पुणे) आणि मयूर गांधी (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन सुरु होते. यावेळी स्मृती इराणी यांना वाढत्या महागाई आणि घरगुती गॅसच्या किमतीबाबत राष्ट्रवादीच्या महिला निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या या तीन कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच साडीचा पदर ओढून अश्लील हातवारे केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे दिसत होते. "मोदी सरकार हाय...मोदी सरकार मुर्दाबाद" अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या होत्या.