Yugendra Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार कुटुंबात झालेल्या संघर्षाची राज्यभर चर्चा झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांना शह देत बारामतीचे खरे 'दादा' आपणच असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार संघर्ष रंगण्याची शक्यता असून आता अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांना विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी आज त्यांच्या समर्थकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच आता अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. या मागणीला शरद पवार हे आगामी काळात कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शरद पवारांनी काय म्हटलं आहे?
शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात कुटुंबातील एखादा तरुण चेहरा पुढे करतील, असं बोललं जात आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी विचारण्यात आलेल्या थेट प्रश्नाला शरद पवार यांनी चाणाक्षपणे उत्तर देत लगेच आपले पत्ते उघड करणं टाळलं होतं. शरद पवार यांना एका यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीदरम्यान बारामती विधानसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पवार यांनी म्हटलं होतं की, "उमेदवार कोण असेल, हे आज सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीला आणखी वेळ आहे. लोकसभा निवडणुकीचं चित्र कसं होतंय, उद्या देशात कोणाची सत्ता येतेय, महाराष्ट्रात भाजपची काय स्थिती राहतेय, या गोष्टी पाहाव्या लागतील. भविष्यात भाजपची सत्ता महाराष्ट्रात येऊ नये, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. या गोष्टीला महाराष्ट्रातील ठिकठिकाणी जे सोईचे उमेदवार असतील, ते देण्याचा आमचा प्रयत्न राहील. निदान मी तरी त्याबाबत अद्याप विचार केलेला नाही," असं म्हणत तेव्हा पवार यांनी याबाबत स्पष्टपणे बोलणं टाळलं होतं.