पिंपरी महापालिकेत 'मानापमान नाट्य'; 'राजशिष्टाचारा'चे पालन न केल्याने राष्ट्रवादीचा 'राडा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 06:02 PM2021-01-11T18:02:34+5:302021-01-11T18:10:03+5:30
चिंचवड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार तथा माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत जाहीर होणार होती.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेची सोडत जाहीर करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमादरम्यान चांगलेच 'मानापमान नाट्य' रंगलेले पाहायला मिळाले. राजशिष्टाचाराचे पालन न केल्याने महापालिकेच्या वतीने ही सोडत रद्द करण्यात आली. यावरून पालकमंत्री अजित पवार यांना निमंत्रण न दिल्याने तर भाजपने ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्याने महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगलाच राडा घालण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवस्ती येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने या योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडण्या योग्य अशा घरांची निर्मिती केली आहे. या योजनेची सोडत सोमवारी दुपारी तीन वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आमदार तथा माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. मात्र राजशिष्टाचार पालन न झाल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला. राष्ट्रवादी- भाजप यांच्या श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत आजची सोडत रद्द करण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेची सोडत जाहीर करण्यात आली. मात्र यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलावल्यामुळे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी नेते राजू मिसाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आगामी काळात पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहे. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेससह मनसे या राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकांसाठी नियोजन, बैठका, दौरे सुरु झाले आहे. पुढील काळात विविध कार्यक्रम उद्घाटन, श्रेयवाद, पक्षांतर ,यावरून राजकीय वातावरण तापणार आहेत.