पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण नसल्याची चर्चा राजकैय वर्तुळात रंगली होती. त्यावरून मोहोळ यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी त्यांनी आज सकाळपासूनच एकालागोपाठ एक ट्विट करत बैठकीला गैरहजर राहण्याची जोरदार उत्तरे दिली आहेत.
“राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी” असं जोरदार प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन दिलं आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन करुन महापौरांना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यांनी आपल्या घरी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, असा दावा राष्ट्रवादीने केला होता.
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील ‘अडगळी’चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे. म्हणूनच वाट्टेल ते बोलायचं, चर्चेत येण्याचा प्रयत्न करताना लोकांची नेहमीप्रमाणे दिशाभूल करायची, ही त्यांची नेहमीची वृत्ती पुणेकरांनी चांगलीच ओळखली. म्हणूनच की काय २०१७ साली ते महापौर असताना त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी झिडकारुन लावले.” अशी टीका त्यांनी केली.
पुणे शहरासाठी महत्वाची बैठक का टाळू?
महापौर म्हणून राज्य सरकारच्या बैठकीला शहराच्या हिताचा विचार करुन गैरहजर राहिलेलो नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीपजी वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बैठकांना माझी उपस्थिती होती. पुण्यातील दर शुक्रवारी होणाऱ्या अजित पवार यांच्या सर्व बैठकांना हजेरी लावून समन्वय साधला आहे. असं असताना पुणे शहरासाठी महत्वाची असणारी बैठक आपण का टाळू? तरीही आपल्याला डावलून का होईना शहराच्या विकासासंदर्भात बैठक होतेय, याचं आपण स्वागतच केलं असल्याचं ते म्हणाले आहेत.
“मंत्रालय बैठक प्रकरणी महापौर खोटे बोलत आहेत, असा राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा हास्यास्पद आरोप आहे. काळ सोकावू नये, म्हणून हा पुणेकरांशी ‘संवादप्रपंच’; कारण आमची बांधीलकी पुणेकरांशी आहे, ना की पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्यांशी” अशी टिप्पणी मोहोळ यांनी केली आहे.
महापौरांचे अनेक प्रश्न
“यावेळी मी मुठा या मुळशी तालुक्यातील गावी माझ्या आई-वडिलांसमवेत होतो. बैठकीला आपल्याला निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच मी मुठा गावाला जाण्याचे नियोजन केलं. ज्या ठिकाणाहून फोनवर बोलताना व्यवस्थित रेंज येत नाही. तिथून अचानकपणे ऑनलाईन सहभागी व्हायचं? बरं बैठकीचा अजेंडा काय? कोणकोणते विषय आहेत? त्या विषयाची सर्वांगीण आणि सद्यस्थितीची माहिती कधी आणि किती वेळात घ्यायची? बैठकीला कोणत्या विषयानुसार काय भूमिका असावी? याबाबत विचारायला करायला किमान वेळ तरी मिळू नये?” असा सवाल मोहोळ उपस्थित केला आहे.