पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या दीपाली धुमाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 08:17 PM2020-01-31T20:17:14+5:302020-01-31T20:17:30+5:30
चर्चेमध्ये नसलेल्या नावाची घोषणा झाल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना धक्का
पुणे : महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेविका दीपाली धुमाळ यांची नावड करण्यात आली आहे. धुमाळ यांच्या निवडीमुळे विरोधी पक्षनेतेपद पुन्हा एकदा वारजे-कर्वेनगर प्रभागाला मिळाले आहे. आधीचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्याच प्रभागाला पुन्हा हे पद मिळाले आहे. चर्चेमध्ये नसलेल्या नावाची घोषणा झाल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना धक्का बसला.
राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर अजित पवार अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री झाले. 2017 पुर्वी पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. ही सत्ता भाजपाने खेचून घेतल्यावर राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसावे लागले. पालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्याच्यादृष्टीने तसेच सत्ताधारी भाजपाला रोखण्याकरिता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरुन लक्ष घातले जाऊ लागले आहे. नुकतीच अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिकेत बैठक घेऊन याची प्रचिती दिली आहे.
पवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यावर या पदावर वर्णी लावून घेण्याकरिता इच्छूकांकडून ‘लॉबिंग’ सुरु करण्यात आले होते. या पदाकरिता खडकवासला विधानसभा निवडणूक लढविलेले नगरसेवक सचिन दोडके, नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, वैशाली बनकर, दिपाली धुमाळ या इच्छुक होत्या. शुक्रवारी यासंदर्भात पालिकेतील राष्ट्रवादीच्या कक्षात नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहराध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेता दिलीप बराटे आदी उपस्थित होते. या बैठकीत धुमाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
धुमाळ यांंनी यापुर्वी महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती, स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा, वृक्ष प्राधिकरण, जैव वैविधता समितीवर काम केले आहे. त्यांचे पती प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ हे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते.
======
धुमाळ यांचे मुळगाव रायगड तालुक्यातील पाली-सुधागड हे असून त्यांचे शिक्षण बीएससीच्या द्वितीय वर्षापर्यंत झाले आहे. त्यांच्या नियुक्तीमागे ‘रायगड’ कनेक्शन असल्याचे बोलले जात असून राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्याशी असलेली बाबा धुमाळ यांची जवळीक उपयोगी ठरल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक बोलत आहेत.