बारामती : नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. ९) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. शहरातील कसबा येथील धों. आ. सातव कारभारी चौकात हे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी एक तास नीरा मार्गावरील वाहतूक रोखली.
केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी, ग्राहक, महिला, विद्यार्थी तसेच व्यापारी हतबल झाले आहेत. ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतेही नियोजन न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला ६० दिवस उलटल्यानंतर देखील सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून निर्माण झालेल्या आर्थिक आणीबाणीमुळे जनता त्रस्त झाली आहे. अनेक गोष्टींमध्ये वाढलेले कर, सातत्याने वाढलेले पेट्रोल, डिझेलचे दर, तसेच शेतीमालाला मिळत नसलेले दर, वाढती बेरोजगारी, सातत्याने महिलांवर होणारे अन्याय, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, शेतकरीविरोधी धोरणाचा जनजीवनावर विपरीत परीणाम झाला आहे, अशी टीका या वेळी करण्यात आली. अच्छे दिन कधी येणार, अदानी अंबानी तुपाशी शेतकरी आमचा उपाशी, किसान टेन्शन में मोदी विदेश में, अब की बार फेकू सरकार, पैसे आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे आदी घोषणाफलक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या वेळी धरणे आंदोलनामध्ये नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, सुभाष ढोले,करण खलाटे, पुरुषोत्तम जगताप, रमेश गोफणे, सतीश तावरे, मदनराव देवकाते, विश्वास देवकाते, अमर धुमाळ, मिलिंद दरेकर, धनवान वदक, सतीश खोमणे, वनिता बनकर, अनिता गायकवाड,दत्तात्रय कुतवळ आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)