भोर : तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत ६ गणांपैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत पंचायत समितीवर सलग तिसऱ्यांदा झेंडा फडकवून हॅट्ट्रिक केली आहे. विरोधी काँग्रेस व शिवसेनेची एक जागा कमी झाली आहे.पंचायत समितीच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ८ पैकी ६ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस व मनसेला एक जागा मिळाली होती. तसेच पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मिळवली होती. २०१२ मध्ये राष्ट्रवादीने ४ जागा काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी २ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला बरोबर घेऊन राष्ट्रवादीने पंचायत समितीची सत्ता राखली होती. दरम्यान, २०१७ मध्ये भोर तालुक्याची लोकसंख्या कमी झाल्यामुळे पंचायत समितीचे २ गण कमी होऊन ८ ऐवजी ६ गण राहिले होते. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपा अशी लढत झाली. यात राष्ट्रवादीला ४, तर शिवसेना, काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. सेना व काँग्रेसची एक एक जागा कमी झाली. राष्ट्रवादीने चार जागा कायम राखत स्पष्ट बहुमत मिळवून भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.पंचायत समितीच्या निवडणुकीत वेळू गणातून शिवसेनेच्या पूनम पांगारे यांनी काँग्रेसच्या रेश्मा पांगारे यांचा पराभव केला. भोंगवली गणातून काँगे्रसचे रोहन बाठे यांनी राष्ट्रवादीचे मनोज निगडे यांचा पराभव करून विजय मिळवला. या गटात मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदान झाले आहे. त्याचा फटका काहींना बसला.सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव भोर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून राष्ट्रवादीकडे भोलावडे गटातून निवडून आलेल्या मंगल बोडके व कारी गणातून इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या दमयंती जाधव या दोन महिला आहेत. शिवसेनेच्या पूनम पांगारे आहेत. मात्र पंचायत समितीत पूर्ण सत्ता राष्ट्रवादीची आल्याने बोडके यांना अधिक संधी असल्याचे बोलले जात असून सभापतिपद दोघींत सव्वा-सव्वा वर्षासाठी विभागूनही घेतले जाऊ शकते. उपसभापतिपदासाठी श्रीधर किंद्रे व लहू शेलार यांच्या नावांवर विचार होऊ शकतो. प्रत्येक गणात एक पद याप्रमाणे निवड होऊ शकते. या ठिकाणीही वरील फॉर्म्युला लागू करू शकतात.नसरापूर गटात काँगे्रसचा उमेदवार विजयी झाल्याने गणातही तसाच कौल मिळेल, असे वाटत असतानाच नसरापूर गणातून राष्ट्रवादीचे लहू शेलार यांनी काँग्रेसच्या संतोष सोंडकर यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. भोलावडे गणातून राष्ट्रवादीचे माजी सरपंच सोपान बोडके यांच्या पत्नी मंगल बोडके यांनी भारती वरखडे यांचा पराभव करून आपला गण कायम राखला. या गटातही मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदान झाल्याने गटाचा आणि गणाचा अनपेक्षित निकाल लागला आहे. कारी गणातून राष्ट्रवादीच्या दमयंती जाधव यांनी काँग्रेसच्या रुक्मिणी घोलप यांचा पराभव केला. बालेकिल्ला असलेल्या उत्रौली गणात राष्ट्रवादीला एकदाही विजय मिळवता आला नव्हता. येथून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (कै.) रघुनाथ किंद्रे यांच्या मुलाने मोठ्या फरकाने विजय मिळवून काँग्रेसच्या अनिल सावले यांचा पराभव करून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. या गटात पॅनल टु पॅनल मतदान झाले. यामुळे तीनही उमेदवार मताधिक्याने विजयी झाले. भोर पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या काँग्र्रेस व शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीने चार जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवत हॅट्ट्रिक केली आहे.
भोर पंचायत समितीत राष्ट्रवादीची हॅट्ट्रिक
By admin | Published: February 26, 2017 3:37 AM