पुणे : गेल्या १० वर्षात पुणे जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद घटली आहे, असा आकडेवारीनिशी दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील पक्षाच्या बैठकीत पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी ६ जागांची मागणी केली. सन २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणूकीत ज्या जागांवर जो पक्ष पुढे त्या जागा त्याला असे सुत्रही या बैठकीत मांडण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण तसेच पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे तसेच पुण्यातील अन्य प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांनीही ६ जागांच्या मागणीला दुजोरा दिला. सन २०१४ ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. कसबा व कॅन्टोमेंट वगळता हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड या ६ विधानसभा मतदारसंघात दुसºया क्रमांकावर होते. त्यामुळे या सर्व जागा राष्ट्रवादीकडे व कसबा कॅन्टोमेट या दोन जागा काँग्रेसला द्याव्यात अशी मागणी बैठकीत करण्यात आली.शहराध्यक्ष तुपे यांनी गेल्या १० वर्षातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील आकडेवारी सादर केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला असलेला नवमतदारांचा पाठिंबा वाढला असल्याचा दावा त्यांनी केला. सन २००९ मध्ये विधानसभा निवडणूक आघाडी करून लढवली होती, त्यावेळी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ४ जागा लढवल्या होत्या. मात्र आता तशी स्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढला असल्याचे त्यांनी विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी देत स्पष्ट केले. अजित पवार यांनी पुण्यातील इच्छुकांची मतदारसंघनिहाय माहिती घेतली. त्यात हपडसरमधून सुरेश घुले, प्रशांत जगताप, वैशाली बनकर, शिवाजीनगरमधून श्रीकांत पाटील, निलेश निकम, कोथरूडमधून बंडू केमसे, स्वप्नील दुधाणे, पर्वतीमधून अश्विनी कदम, नितीन कदम, खडकवासला मधून रुपाली चाकणकर, दिलीप बराटे, सचिन दोडके आदींनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, जास्तीजास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
पुण्यात विधानसभेसाठी राष्ट्रवादीची " हाय डिमांड " : ८ जागांपैैकी ६ ची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 8:45 PM