बारामती : पार्थला काहीच सल्ला देणार नाही. नवीन कार्यकर्त्यांना ठेचा लागतात. त्यानंतर कार्यकर्ते शहाणे होतात असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तसेच मावळमधील उमेदवारी ही रिस्क असल्याचे सांगताना पवार कुटुंबातील सदस्याला हक्काच्या जागेवर लढवलं नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
बारामती येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते, पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणावरून मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. आपण याबाबत नातवाला काय सल्ला देणार, असा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारला होता. त्यावर पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरक्षित ठिकाणी कुटुंबातील उमेदवारांना उमेदवारी दिली नाही. उलट गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेले नाही. त्या ठिकाणी नवखा उमेदवार देऊन प्रयोग केला आहे. निवडून येणाऱ्या खात्रीच्या ठिकाणी माढ्यामध्ये हा प्रयोग केलेला नाही. माढा ही हक्काची सीट आहे. या ठिकाणी सामान्यांची कामे करून यशस्वी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी काम पाहिलेल्या उमेदवाराला संधी दिली आहे. मात्र, नवीन असणाऱ्या उमेदवारांसाठीच मावळसारख्या ठिकाणी पक्षाने ‘रिस्क’ घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाला टोला लगावताना पवार म्हणाले, एकेकाळी विचारांनी जाणारा पक्ष होता. मात्र, आता विचार बाजुला राहिले आहेत. इतर पक्षातील लोकांना घ्यायचे हा त्यांच्या धोरणाचा भाग दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारांची कमतरता नाही. मात्र, भाजपने इतर पक्षातील जास्तीत जास्त लोकांना प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज बारामती येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत.