पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांनी एका तरुणीला नोकरीच्या आमिषाने 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर तिला गाडीत बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता याच प्रकरणी शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पीडित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला गर्भित इशारा दिला आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना पीडित तरुणीने 5 दिवसांच्या आत मला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला आहे. आणि माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख हेच जबाबदार असतील असेही सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेख हे अडचणीत आले आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री व शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात चर्चेत आले आहे. त्याअगोदर धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरून देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांचा मारा करण्यात येत आहे. त्यात मेहबूब शेख यांचे प्रकरण समोर आल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे.
मेहबूब शेख यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून बलात्कार केला आहे. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटला तरीदेखील अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही. सर्वसामान्य लोक आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, मंत्र्यांसाठी कायदा समान नाही का? असा सवाल देसाई यांनी विचारला आहे. तसेच न्याय मिळाला नाही तर पीडित तरुणीने आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुलीने काही बरे वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.