पुणे : महानगरपालिकेने तलावांमध्ये नसलेली जलपर्णी काढण्यासाठी २३ कोटींची निविदा काढली तसेच सँलसबरी पार्क येथे 1 लाख पासून 14 लाख रुपयापर्यतचे एक झाड लावले जाणार आहे. ही पुणेकर करदात्यांची एक प्रकारची लूट असून ही लूट थांबविण्याची मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महापालिकेमध्ये आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे शहराच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या सर्व गैरव्यवहारांमागील सूत्रधाराचा शोध लावण्याची व चौकशी करून अहवाल त्वरीत जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
जलपर्णी काढण्याच्या निविदेवरून महापालिकेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये यावरून मागील आठवड्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला.याच विषयावर आता राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी होत आहे. या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष चेतन तुपे, पालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, प्रशांत जगताप, निलेश निकम, नितीन कदम, डॉ. सुनीता मोरे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पालिकेच्या पायऱयांवर बसून घोषणाबाजी केली.