इंदापूरमध्ये काँग्रेसच राष्ट्रवादीचा विरोधक : भरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:06 AM2018-12-23T00:06:42+5:302018-12-23T00:06:58+5:30
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचा विरोधक भाजपा-शिवसेना नाहीतर काँग्रेसच आहे, अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
इंदापूर : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचा विरोधक भाजपा-शिवसेना नाहीतर काँग्रेसच आहे, अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
कोठळी (ता. इंदापूर) येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीसह विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
भरणे म्हणाले, बावडा ते नरसिंहपूर ५१ कोटी रुपयांचा रस्ता नरसिंहपूर देवस्थानच्या आराखड्यात नसताना तो मंजुर केला. बावड्यावरुन भांडगावला जाणारा रस्ता बावड्याच्या पाटलांना का दिसला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन बावडा ते गिरवी या रस्तासाठी ४ कोटी ९५ लाख रुपये मंजुर करुन घेतल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शशिकांत तरंगे यांनीदेखील हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, सतत मुख्यमंत्र्यांशेजारी असणाऱ्या नेतृत्वाने उजनी धरणातून उपसा सिंचन योजना का राबवली नाही. त्यामुळेच इंदापुर तालुक्यातील जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली. यावेळी यशवंत माने, अमोल भिसे, हामा पाटील, तात्यासाहेब वडापुरे, महेंद्र रेडके, प्रकाश शिंदे, सतीश पांढरे, संतोष भोसले, प्रताप चवरे, अमर पाटील, प्रकाश मारकड, संदीप भोग उपस्थित होते.
इंदापूरची जागा राष्ट्रवादीलाच
जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने म्हणाले की हर्षवर्धन पाटील क्रार्यक्रमाला गेले की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळ जाऊन फोटो काढतात. तालुक्यात फोटो पाठवुन म्हणतात की इंदापूर विधानसभेची जागा मलाच मिळणार. त्यांना एवढी भीती कशाची वाटते? यापुढे इंदापूरची जागा राष्ट्रवादीलाच असणार आहे त्यामुळे पाटील यांनी नसते उद्योग बंद करावेत, अशी टीका प्रवीण माने यांनी केली.