पुणे : लाेकशाही मार्गाने उपाेषण करणाऱ्या अण्णा हजारे यांना पाठींबा देण्यासाठी व आंदाेलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने पुण्यातील अभिनव काॅलेज चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले.
या आंदाेलनात शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, नगरसेवक सुभाष जगताप,शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष निलेश निकम, महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष राकेश कामठे आदी उपस्थित हाेते. तुपे पाटील म्हणाले की जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत त्या मागण्यांवर हे सरकार सत्तेवर आले आहे.आज अण्णांनी त्या मागण्यांचे पत्र पंतप्रधानांना पाठविले असता त्यांनी शुभेच्छा म्हणून अण्णा हजारेंना परत पत्र पाठविले , लोकशाही ची थट्टा या सरकारने चालविली आहे .लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हे सरकार दडपशाही करीत आहे. मुख्यमंत्री तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुत्ते म्हणून संबोधत आहेत. ज्या घटनेने देश एकसंध ठेवण्याचे काम केले त्या घटनेला आव्हान हे जातीयवादी सरकार देत आहे. भारतीय लोकशाही वर घाला घालण्याचे काम या सरकारकडून होत आहे.
दरम्यान गांधीजींची प्रतिमा यावेळी आंदाेलनकांनी हातात धरली हाेती. तसेच सरकारच्या निषेधार्थ घाेषणा दिल्या.