पुणे : पुण्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन असल्याने नागरिकांवर निर्बंध असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहर कायार्लयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करताना कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले. विशेष म्हणजे, कोरोनामुळे पाळावयाच्या निर्बंधाबाबत आग्रही असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीती हा कार्यक्रम झाला.
पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नूतन कार्यलयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी झाले. पुण्यामध्ये शनिवार आणि रविवार लॉकडाऊन आहे. जमावबंदी आणि संचारबंदी आहे, तरीही मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले होते. अजित पवार यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला, तेव्हा त्यांनाही गर्दीतून वाट काढत जावे लागले. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित राहिलेच.
दरम्यान, कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी झालेली गर्दी ही पुणेकरांच्या जिवाशी खेळणारी आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली. पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना १५ दिवस होम क्वारंटाईन केले पाहिजे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात सकाळी केले. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष जगताप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गर्दी जमवितात. हा प्रकार म्हणजे ''तुम्ही काहीही बोला, पण मला वाटेल तेच मी करणार'', असे वागण्याचाच प्रकार असल्याची टीका सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहता पुणे शहरातून कोरोना हद्दपार झाला आहे, असा समज राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा झालेला दिसतोय. ही गर्दी पाहून अजित पवारांना जाहीर माफी मागावी लागली. तसेच आयोजकांवर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे लागले, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय? राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी केलेल्या चुकीची शिक्षा पुणेकरांना भोगावी लागणार आहे.
गर्दीचा फोटो झाला व्हायरल
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या गर्दीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. शनिवार- रविवार घरातच राहा, बाहेर पडू नका असे आवाहन करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही गर्दी कशी चालते, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. नियम फक्त आम्हालाच का? असेही विचारले आत आहे.
अजित पवारांची नाराजी, पण पोलीस काय कारवाई करणार?
कार्यक्रमात बोलताना गर्दीबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, पोलीस याबाबत काय कारवाई करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांकडून किरकोळ नियमांचा भंग केल्याबद्दल दंड वसूल केला जातो. मग राजकीय नेत्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.