पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे कार्यकर्ते विशाल माेरे आणि राेहन बागवान या कार्यकर्त्यांनी पुण्यातील भाजप कार्यालयावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.
शिखर सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. भाजप सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आराेप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज बारामती बंदची हाक दिली हाेती. तसेच राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पुण्यातही आज राष्ट्रवादीच्या वतीने मंडई येथे निदर्शने करण्यात आली. त्यातच संध्याकाळच्या वेळेला पुण्यातील भाजप कार्यालयावर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या गेटवर शाई फेकली तसेच जाेरदार घाेषणा दिल्या. त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जंगली महाराज रस्त्यावरील सन्मान हाॅटेल येथे भाजपाचे शहर कार्यालय आहे. येथूनच भाजपाचे काम चालते. याच हाॅटेलच्या गेटवर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शाई फेकत घाेषणा दिल्या.