पुणे : स्मार्ट सिटी आराखडयानुसार स्पेशल पर्पज व्हेईकलला (एसपीव्ही) कर लावण्याचे, कर्ज काढण्याचे, मालमत्ता गहाण ठेवण्याचे, अॅमिनिटी स्पेस ताब्यात घेण्याचे अधिकार देण्यात आल्यामुळे महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी रविवारच्या बैठकीमध्ये त्याला तीव्र विरोध दर्शविला. यापार्श्वभुमीवर एसपीव्हीच्या या अधिकाऱ्यांना कात्री लावण्याच्या उपसुचना देऊन स्मार्ट सिटी आराखडयाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रात्री उशीरा घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्मार्ट सिटी आराखडयावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी महापालिकेची मुख्यसभा होत आहे. याबाबत भुमिका ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला महापौर दत्तात्रय धनकवडे, पक्षाच्या शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. स्मार्ट सिटी आराखडयावर सर्व नगरसेवकांच्या भावना अजित पवार व सुनील तटकरे यांनी सविस्तरपणे ऐकून घेतल्या. बैठकीमध्ये नगरसेवकांनी तीव्र शब्ंदामध्ये आपल्या स्मार्ट सिटी आराखडयाबाबतच्या भावना मांडल्या. त्यानंतर अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी रात्री उशीरा घरी बोलवले.स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणी स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणून स्थापन केल्या जाणाऱ्या कंपनीमुळे महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येणार असल्याची भुमिका नगरसेवकांकडून मांडण्यात आली. कंपनीला कर लावण्याचे, कर्ज घेण्याचे, मालमत्ता गहाण ठेवण्याचे अधिकार असल्याचे आराखडयात नमूद करण्यात आले आहे, याला नगरसेवकांनी आक्षेप घेतला. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार अनेकदा महत्त्वाच्या प्रस्तावांचे डॉकेट उशीरा स्थायी समिती व मुख्यसभेसमोर आणतात त्याबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. या तरतुदी वगळण्याच्या उपसुचना देण्याची भुमिका यावेळी मांडण्यात आली.आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटीचा संपूर्ण आराखडा स्थायी समितीसमोर सादर केला नाही, त्या अपूर्ण आराखडा देऊन मंजुरी घेतली. त्यानंतर मुख्यसभेसमोर आराखडा आल्यानंतर त्याला पुरवणी जोडण्यात आली, आयुक्त विश्वासात घेऊन काम करीत नाही अशा तक्रारी यावेळी नगरसेवकांनी केल्या. औंध व बाणेर या विकसित भागाचाच या स्मार्ट सिटी आराखडयातून पुन्हा विकास केला जाणार आहे, त्याऐवजी पेठ परिसर किंवा उपनगरांचा यामध्ये समावेश व्हायला हवा होता अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचा उपसुचनांसह पाठिंबा?
By admin | Published: December 14, 2015 12:36 AM