पुणे : राष्ट्रवादीला बहुमत असतानाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी दुरंगी लढत होऊन बारामतीचे विश्वास देवकाते यांनी ७५ पैैकी ५३ मते घेऊन भाजपाच्या जयश्री पोकळे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. उपाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होऊन राष्ट्रवादीच्या आंबेगावच्या विवेक वळसे-पाटील यांनी ७५ पैैकी ५३ मते घेऊन शिवसेनेच्या ज्ञानेश्वर कटके व भाजपाच्या नितीन मराठे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७५ जागांपैकी ४४ जागा मिळवून राष्ट्रवादी काँगे्रसने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष होणार, हे निश्चित होते.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी (ओबीसी) आरक्षित आहे. सोमवारी अजित पवार यांनी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. अध्यक्षपद हे ओरिजन ओबीसीलाच देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार बारामतीचे धनगर समाजाचे विश्वास देवकाते व जुन्नरचे पांडुरंग पवार यापैकी एकाला अध्यक्षपद मिळणार, हे निश्चित झाले होते. मंगळवारी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या ४४ सदस्यांच्या झालेल्या बैैठकीत कामठे यांनी अध्यक्षपदासाठी विश्वास देवकाते व उपाध्यक्षपदासाठी विवेक वळसे-पाटील यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर त्या दोघांनी आपली नामनिर्देशनपत्रे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे दाखल केली. तसेच अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या आशा बुचके व भाजपाच्या जयश्री पोकळे यांनीही नामनिर्देशनपत्रे दाखल केली. उपाध्यक्षपदासाठीही शिवसेनेचे ज्ञानेश्वर कटके व भाजपाचे नितीन मराठे यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. यात सर्वांची नामनिर्देशनपत्रे वैध असल्याचे सांगत राव यांनी माघारीसाठी वेळ दिला. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेसह, भाजपाला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गळ घातली. त्यानंतर शिवसेनेच्या आशा बुचके यांनी माघार घेतली. भाजपाने मात्र आपला अर्ज कायम ठेवल्याने निवडणूक झाली. यात देवकाते व पोकळे या दोघांत निवडणूक झाली. देवकाते यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ४४, अपक्षांची दोन व काँग्रेसची ७ मते अशी ५३ मते पडली. भाजपाच्या जयश्री पोकळे यांना भाजपाची सात व रासपचे एक अशी आठ मते पडली. शिवसेनेचे १३ व एक अपक्ष असे १४ जण तटस्थ राहिले. अध्यक्षपदासाठी शिवसेनेने माघार घेतली, मात्र उपाध्यक्षपदासाठी आपला उमेदवार कायम ठेवला. उपाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. यात राष्ट्रवादीकडून विवेक वळसे-पाटील, शिवसेनेकडून ज्ञानेश्वर कटके व भाजपाकडून नितीन मराठे रिंगणात राहिले. विवेक वळसे-पाटील यांना राष्ट्रवादी व काँग्रेसची मिळून ५३ मते पडली, ज्ञानेश्वर कटके यांना १३ व नितीन माराठे यांना आठ मते पडली. यानंतर पीठासन अधिकारी सौरभ राव यांनी अध्यक्षपदी विश्वास देवकाते व उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर देवकाते यांनी प्रदीप कंद व विवेक वळसे-पाटील यांनी शुक्राचार्य वांजळे यांच्याकडून पदभार स्वीकारला. (वार्ताहर)
अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विश्वास देवकाते
By admin | Published: March 22, 2017 3:06 AM