पुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या एका प्रशिक्षणार्थी जवानाने दाखवलेल्या शौर्यामुळे लष्कराच्या अधिका-यांनीही त्याला सॅल्यूट ठोकला आहे. शर्यतीत विजय किंवा पराभवाची चिंता न करता जखमी साथीदाराला मदत करणं आपलं पहिलं कर्तव्य असल्याचं या जवानाने दाखवून दिलं. आपल्या जखमी साथीदाराला खांद्यावर घेऊन त्याने जवळपास अडीच किमीपर्यंत धाव घेतली. जखमी साथीदाराला खांद्यावर घेऊनच त्याने शर्यत पूर्ण केली. जखमी झाल्याने आपला साथादीर शर्यतीत मागे राहू नये ही भावना त्यामागे होती. जवानाने केलेली ही कामगिरी पाहून इतर जवानांकडून त्याचं कौतुक होत आहे. जवानाच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी त्याचा विशेष सत्कारही करण्यात आला आहे. या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचंही कौतुक केलं जात असून इथे फक्त शूर नाही तर माणुसकी जपणारे जवानही तयार होतात ज्यांच्यात त्याग, सहकार्याच्या भावना निर्माण होतात असं म्हटलं जात आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीकडून दर सहा महिन्याला क्रॉस कंट्री रेस आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत 12 किमी अंतर पार करायचं असतं. या स्पर्धेत पहिल्या टर्ममधील जवान सोडून इतर सर्वांनी सहभाग घेणं अनिवार्य असतं. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेदरम्यान सहाव्या आणि अंतिम टर्मचा जवान चिराग अरोरा याने आपला साथीदार जेवेश जोशी जखमी असल्याचं पाहिलं. जेवेश जोशी पुढे धावू शकत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. यावेळी इतर कोणी असतं तर कदाचित त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या धावण्यावर लक्ष केंद्रित केलं असतं. पण चिरागने तसं केलं नाही. चिरागने शौर्य आणि माणुसकी दाखवत जेवेश जोशीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि धावण्यास सुरुवात केली. अडीच किमी अंतर पार केल्यानंतर दोघांनी एकत्र शर्यत पूर्ण केली.
चिराग जेवेशला आपल्या खांद्यावर घेऊन धावत असल्याचं पाहून मैदानात उपस्थित असणा-यांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. चिरागला शर्यत पूर्ण करण्यासाठी 55 मिनिटं लागली. आपल्या साथीदाराने शर्यत पूर्ण न केल्याने त्याचा स्कोअर कमी होऊ नये यासाठी चिरागने प्रयत्न केल्याचं एका अधिका-याने सांगितलं आहे. अकॅडमीकडून इंटर स्क्वॉड्रन चॅम्पिअनशिप ट्रॉफी ठेवली जाते. अकॅडमीचा भाग झाल्यानंतर प्रत्येक जवानाला 18 पैकी एक स्क्वॉड्रन दिलं जातं. प्रत्येक स्क्वॉड्रनसाठी ही करा किंवा मरा रेस असते. मेजर सुरेंद्र पुनिया यांनी जवानांचा फोटो ट्विट करत सोल्जर स्पिरीट असल्याचं म्हटलं आहे, सोबतच शूर जवानाचा सन्मान करण्यात आल्याचं सांगितलं आहे.