पुणे, दि. 31 - ‘समाजात ज्येष्ठांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक मिळण्याकरिता शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात मधुरभाव वृद्धाश्रम करीत असलेले कार्य खरोखरीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी केले. पुणे परिसरातील पिंपळे निलख भागात सामाजिक कार्यकर्त्या अंजली देशपांडे यांच्या मधुरभाव ज्येष्ठ नागरिक केंद्राला आज त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या.डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेच्या वतीने हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या मातोश्री वृध्दाश्रमामुळे अनेक ज्येष्ठांना एक भक्कम आधार प्राप्त झाला. या योजनेची लोकप्रियता अजूनही आहे. या अंतर्गत सुरु झालेल्या अनेक ठिकाणी आता आधुनिक सोयी सुविधा देण्याची आवश्यकता आहे.’ त्यांनी आज ठिकाणी भेट देऊन येथे राहत असलेल्या ज्येष्ठांशी त्यांनी संवाद साधला. या सर्व ज्येष्ठांनी शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांची भेट झाल्याच्या हृद्य आठवणी जाग्या केल्या. शिवसेनेच्या जुन्या काळातील चळवळी, आंदोलने याचेही स्मरण करून दिले. इथे राहत असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक हे विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या हुद्द्यांवर काम केलेले असून उच्चशिक्षित आहेत. त्यातील काहीजण अल्झायमर सारख्या आजारांनी त्रस्त असूनही केंद्रात त्यांची उत्तम व्यवस्था व काळजी घेतली जात असल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.डॉ. गोऱ्हे यांनी येथे असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, नगरसेविकाआरती चोंधे उपस्थित होत्या. श्रीमती देशपांडे यांनी केंद्राची माहिती दिली. या प्रकारच्या केंद्रांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात अशी मागणी देशपांडे यांनी यावेळी केली.
मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता, मधुरभाव वृद्धाश्रम एक उत्कृष्ट व्यवस्थापन - नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 7:24 PM