लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात दररोज सरासरी दहा हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. शहर आणि ग्रामीण भागात मिळून २६ हजार ९९६ रुग्ण सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या गंभीर रुग्णांचे प्रमाणदेखील मोठे आहे. विशिष्ट परिस्थितीत काही गंभीर रुग्णांना रेमडेसिविर द्यावेच लागते. हाॅस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता दररोज एकट्या पुणे जिल्ह्यासाठी १८ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सची गरज आहे. परंतु सध्या दररोज केवळ ३ ते ५ हजारच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत आहे.
पुणे जिल्ह्यात रेमडेसिविरचा पुरवठा वाढविण्यासाठी विविध पातळीवर प्रचंड प्रयत्न सुरू असून, रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा सुरळीत करण्यात अद्याप यश आलेले नाही.
रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढल्याने इंजेक्शन्सचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. औषध विक्रेते, वितरक आणि मेडिकलकडून नागरिकांना वेठीस धरून मनमानी पद्धतीने पैसे उकळणे सुरू झाले. यामुळेच शासनाने तातडीने मेडिकलमधील रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री थांबवून थेट हाॅस्पिटला रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरू केला. यामुळे काही प्रमाणात काळाबाजार थांबला असला तरी रुग्णांना वेळेत रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. एका-एका इंजेक्शन्ससाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासाठी सरासरी कधी ३ हजार तर कधी ५ किंवा सहा हजार या पट्टीत रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत आहे. परंतु हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता दररोज किमान १८ हजार रेमडेसिविरची मागणी आहे. त्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे.
-------
- पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या : १ लाख १ हजार ७६८
- हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण : २६ हजार ९९६
- होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण : ७४ हजार ७७२
- दररोज रेमडेसिविर इंजेक्शनची गरज : १८ हजार
- पुणे जिल्ह्यासाठी दररोज होणारा रेमडेसिविरचा पुरवठा : ३ ते ५ हजार