अहमदनगर : नगर जिल्ह्यात असलेल्या साडेतीन हजार शाळांपैकी ५६५ शाळांमधील धोकादायक १८२४ खोल्या गेल्या तीन वर्षांत निर्लेखित केल्या आहेत. परंतु पटसंख्येच्या प्रमाणात सध्या नवीन ९३० शाळाखोल्यांची गरज असून, त्यातील ३१६ खोल्यांच्या कामांना मार्च २०२१अखेर मंजुरी मिळाली आहे. अजूनही सहाशेहून अधिक खोल्यांची कमतरता आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५७३ शाळा आहेत. मात्र, त्यातील अनेक शाळा खोल्यांची पडझड झाली आहे. निंबोडी येथील २०१७ मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शाळाखोल्या दुरुस्ती तसेच नवीन खोल्या बांधकामाचा विषय ऐरणीवर आला. त्यानुसार मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले. जिल्ह्यात सध्या ९३० शाळा खोल्यांची गरज असून त्यापैकी ३१६ शाळांना चालू आर्थिक वर्षात प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी २८ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ३०९ शाळा खोल्यांची दुरुस्तीही विचारात घेतली असून त्या दुरुस्तीलाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी वेगळी तीन कोटींची तरतूद आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत या खोल्यासाठी मंजूर निधी खर्च करायचा आहे.
तरीही अजून सहाशेहून अधिक शाळाखोल्यांचा प्रश्न असून त्यासाठीही निधी मंजूर व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
--
एका खोलीसाठी पावणेनऊ लाखांची तरतूद
यात एका शाळा खोलीसाठी ८ लाख ७५ हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. या रकमेत शाळाखोली पूर्ण होणे आवश्यक आहे. केवळ आदिवासी भागात यात ७५ हजार रुपये वाढवून देत एका खोलीसाठी साडेनऊ लाख रुपयांची तरतूद आहे.
------------
मांडवे येथील दोन प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या खूप जुन्या आहेत. त्यामुळे त्या निर्लेखित करून नवीन ३ शाळा खोल्या मंजूर होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या खोल्या मिळाव्यात.
- सुभाष निमसे, सरपंच, मांडवे, ता. नगर
------------