राजगुरुनगर: देशाच्या स्वातंत्र्य लढयात इंग्रजांशी कडवा संघर्ष करताना क्रांतिकारकांनी स्वत:वर अत्यंत कठोर नियम लादून घेतले होते. त्यांच्या योगदानातुन आणि बलिदानातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या कोरोनाच्या जागतिक संकटाला सामोरे जाताना स्वातंत्रपूर्व काळातील क्रांतीकारकांची ही मानसिकता अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे सोमवारी (दि २४) अभिवादन कार्यक्रम झाला. राजगुरुनगर बस स्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू,भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृती शिल्पाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर आढळराव पाटील बोलत होते. अभिवादन कार्यक्रमात प्रांताधिकारी संजय तेली,तहसीलदार सुचित्रा आमले,खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील,सेनेच्या विजया शिंदे, मुकुंद आवटे,कोंडीभाऊ टाकळकर आदी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरू वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला.खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते वाड्यावर ध्वजारोहण करण्यात आले.हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे सुशील मांजरे,संदीप वाळुंज,शैलेश रावळ,विठ्ठल पाचारणे,अमित टाकळकर यावेळी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, जुलमी राजवटीतुन भारत देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अनेक यातना निमूटपणे सहन केल्या. आजच्या संकट काळात या योगदानाचे स्मरण करा आणि स्वत:सह समाजाचे हित जोपासण्याचे ध्येय निश्चित करा असे आवाहन माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.