• विद्यार्थ्यांना काय शिकायचे या पेक्षा कसे शिकायचे ह्यासाठी सक्षम बनवावे लागेल.
• एक शिक्षक ४० ते ८० मुलांना शिकवत होता पण आता प्रत्येक विद्यार्थ्याला (Personalised
learning) त्याच्या वेगानुसार, त्याच्या कुवतीनुसार शिकवावे लागेल.
• मूल्यांकनाच्या पद्धतीमध्ये बदल होतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकमेकांविषयी अभिप्राय लगेच मिळू शकतील ज्यामुळे लवकर सुधारणा करणे सोपे होईल.
• विद्यार्थ्याच्या मूल्यमापनासाठी प्रभावी रुब्रिक तयार करावे लागतील. शाळांमध्ये पालक-शिक्षकांतील भेट, संवाद, सहयोग याची जरूर भासेल.
• विद्यार्थ्यांच्या मानसिक तंदुरुस्तीसाठी आयुष्यात लागणारी कौशल्ये, व्यावहारिक शिक्षण, तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर सेफ्टीचे शिक्षण अनिवार्य करावे लागेल. संमिश्र (blended) अध्यापन पद्धत एखादे व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंग साॅफ्टवेअर वापरून अध्यापन करणे याला संमिश्र शिक्षण म्हणता येणार नाही. एखादा विद्यार्थी, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर मोबाईल वापरुन उत्तरे देत असेल किंवा शिक्षक डिजिटल बोर्डवर आकृती काढत आहे आणि विद्यार्थी वहीत उतरवून घेत आहे यालासुद्धा आपण संमिश्र अध्यापन पद्धती म्हणू शकणार नाही. पण जर शिक्षकाने एखादा चित्रपट किंवा माहितीपट घरी बघायला सांगितला आणि वर्गात आल्यावर विद्यार्थ्यांनी त्यातील घटनांवर शिक्षकांबरोबरच अन्य विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून त्यातील बारकावे समजून घेतले तर ते ख-या अर्थानी संमिश्र शिक्षण झाले. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा वेळ, ठिकाण, वेग आणि मार्ग यावर अधिक नियंत्रण प्रदान करून शिकवणे हा संमिश्र पद्धतीमधील सगळ्यात मोठा फायदा आहे. यामध्ये दोन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकते. १. सिंक्रोनस पद्धत - यामध्ये शिक्षक विद्यार्थी समोरासमोर अध्यापन करत असतो,
ऑनलाईन किंवा प्रत्यक्षात फेस टू फेस.
२. असिंक्रोनस पद्धत - यात शिक्षक प्रत्यक्षात विद्यार्थ्यासमोर नाही पण तरीही विद्यार्थी शिकत असतो. यात व्हिडीओ क्लीप बघणे, पोडकास्ट (ऑडिओ क्लीप ) ऐकणे. Online
चर्चा करणे, पुनरावलोकन, अन्वेषण करणे यावरून विद्यार्थी शिकतो. यामध्ये माध्यमापेक्षा, शिक्षक कसे शिकवतो, त्याची शिकवण्याची पद्धत महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांना एकात्मिक (integrated) शिक्षणाचा अनुभव देऊन शिकवणे हेच यापुढे शिक्षकाचे कौशल्य ठरणार आहे. वर्गात प्रत्यक्षात / फेस टू फेस शिकवताना साधारणतः ७०% सिंक्रोनस आणि ३० % असिंक्रोनस पद्धतीचा तर ऑनलाईन पद्धती मध्ये ३०% सिंक्रोनस आणि ७०% असिंक्रोनस अवलंब करणे योग्य ठरेल. विद्यार्थी साधारणतः सहा टप्प्यांमध्ये नवीन विषय शिकतो. १. विषय संपादन करणे (Acquisition) २. त्याबद्दल विविध ठिकाणी चौकशी करणे (Inquiry) ३. विषयाचा सराव करणे ४. अन्य सहकार्यांशी त्याबद्दल चर्चा करणे ५. सहका-याबरोबरच्या सहयोगातून विषय अजून खोलात समजून घेणे (Collaboration) ६. शिकलेल्या विषयामध्ये नवीन काही तयार करणे (create) या सहाही टप्प्यांचा समावेश संमिश्र शिक्षण पद्धतीमध्ये करणे आवश्यक आहे. ही पद्धत वापरून भविष्यातील वर्ग कसे असावेत याची काही मॉडेल्स / पद्धती आहेत. जसे स्टेशन रोटेशन, इंडिव्हिजुअल रोटेशन, फ्लीप्ड क्लासरूम, लॅब रोटेशन, फ्लेक्स मोडेल, आला कार्ट मोडेल, एनरीच्ड व्हर्च्युअल मोडेल. बरेच सोफ्टवेअर टूल्स यासाठी उपलब्ध आहेत. याबद्दल परत कधी तरी बोलू. जर शिक्षकांनी यावर काम केले, तर शाळा कॉलेजला आलेली मरगळ जाऊन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि सर्जनशीलता वाटून शिक्षण संस्थांना एक नवीन उजाळा मिळेल.
डॉ. दीपाली सवाई