बारामती : दुष्काळाची तीव्रता वाढत असताना, बारामतीच्या जिरायती भागातील पेरण्या संपूर्णपणे वाया गेल्या आहेत. पावसाच्या अनिश्तितेच्या पार्श्वभूमीवर बागायती भागातील शेतकऱ्यांनीही पीकपद्धतीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. बागायती भागातील शेतकऱ्यांनी नियंत्रित शेतीकडे वळाले पाहिजे तरच दुष्काळी परिस्थितीत बागायती भागातील शेती वाचेल, असे मत शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केले.धरण परिसरातही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले जाऊ शकतात. सध्या जे पाणी आहे त्याचा शेततळ्यांच्या माध्यमातून साठा करणे गरजेचे आहे. त्यावर कमी पाण्यावर येणारी आणि आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी पिके घ्यावी, असे आवाहनही शेतीतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. सध्या पावसाळी ऋतूचा शेवटचा महिना सुरू आहे. या महिन्यातही दुर्दैवाने जर पाऊस पडला नाही, तर पुढील काळात बागायती भागात सध्या केल्या जाणाऱ्या ऊस लागवडींना फटका बसू शकतो. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामानाने उसाचे दर कमालीचे घसरले आहेत. उत्पादन खर्चाचा विचार करता सध्या उसाला मिळणारा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही. असे असताना आता पाण्याअभावी ऊसशेतीदेखील धोक्यात आली आहे. बारामती-इंदापूर परिसरातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसलागवडी झाल्या आहेत. उसापेक्षा मक्याची लागवड फायद्याची उसापेक्षा मकापिकाला पाणी कमी लागते. तसेच हे पीक तीन महिन्यांच्या कालावधीत येते. सध्या मका प्रतिक्विंटल १२८० रुपये दराने विकली जात आहे. एकरी अंदाजे सरासरी २० ते २५ क्विंटल मक्याचे उत्पादन निघाले तरी उसापेक्षा मका शेतकऱ्याला फायद्याची ठरणार आहे. तसेच मक्याचा उत्पादन खर्चदेखील कमी आहे. मात्र उसाचा उत्पादन खर्च मिळणाऱ्या दराच्या तुलनेत कमालीचा वाढला आहे. मशागतीपासून ते बांधणीपर्यंत ३० ते ३५ हजारांपर्यंत उसाचा उत्पादन खर्च जातो. विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर...सध्या नीरा नदीत वाळूमाफियांचे रात्रंदिवस वाळू उपशाचे काम वेगाने सुरू आहे. गावातील बोअरवेल व विहिरींच्या पाण्याची पातळी अधिकच खोल गेली आहे. इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी निमसाखर या ठिकाणी गावालगतचा वाळूउपसा त्वरित बंद करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. निरवांगी : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरवांगी, निमसाखर, दगडवाडी, हगारवाडी, रणगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाटबंधारे खात्याचे पाणी वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जळून खाक झाली आहेत. मात्र, एकही शासकीय व राजकीय पदाधिकारी साधी पाहणी व चौकशीसाठीसुद्धा फिरकले नसल्याचे चित्र आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत या भागाला तत्काळ भेट द्यावी. येथील सर्व पिकांची पाहणी करावी, अशी मागणी निमसाखर येथील चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी केली आहे.
पीक पद्धतीत बदलाची गरज
By admin | Published: September 01, 2015 3:52 AM