बारामती : जंगले वाचविण्यासाठी केवळ घोषणाबाजी करून उपयोग होणार नाही. अलीकडच्या काळात जंगलांना आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियावर फक्त याबाबत नाराजी व्यक्त होते; परंतु जंगलांना लागलेल्या आगी विझविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. स्थानिक नागरिक व वन कर्मचाऱ्यांनी एकत्रित आगी विझविण्यासाठी प्रयत्न केल्यास जंगलांना लागलेल्या आगी आटोक्यात येण्यास मदत होईल. आजच्या सेल्फी काढण्याच्या नादात फक्त फोटो काढणे आणि प्रसारित करणे एवढेच काम होऊ शकते. प्रत्यक्ष मात्र वणवे विझविण्यासाठी डोंगरदऱ्यांमध्ये उतरताना कोणीच दिसत नाही. दर वर्षी डोंगर जळत आहेत. त्याबरोबर वन्यप्राणीही होरपळून निघत आहेत. काँक्रीटच्या जंगलात वन दिन साजरा करण्यापेक्षा प्रत्यक्ष वनात जाऊन वन दिन साजरा केल्यास जंगलांशी आपुलकीचे नाते निर्माण होणार आहे. सध्या देखाव्यासाठी शहरांमध्ये, बागबगिचांमध्ये, घराच्या अंगणामध्ये परकीय झुडपे लावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे येथील बहुउपयोगी देशी झाडांना हद्दपार व्हावे लागत आहे. वनविभागदेखील परकीय झाडांनाच खतपाणी घालून वाढवत आहे. माळरानावर असणाऱ्या वन विभागाच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात उंबराच्या झाडाची लागवड झाली पाहिजे. मात्र, तसे न होता केवळ देखाव्यासाठी परकीय झाडांना पसंती दिली जात आहे. उंबराच्या झाडामुळे पशुपक्ष्यांना अन्नपाणी आणि निवाराही मिळतो. ज्या वनात स्थानिक प्रजातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत, अशा भागात वन्यजीव जास्त प्रमाणत दिसून येतात. अगदी आजकाल शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष सुरू असून हा संघर्ष केवळ वनातील अन्न आणि पाणी नष्ट होत असल्यामुळेच वाढीस लागला आहे. आता शेतातील उपयोगी झाडे असून त्यांची फळे खाण्यासाठी आणि शेतातील पीक खाण्यासाठी वन्यजीव शेतीकडे वळत आहेत. परिणामी, संघर्ष वाढत आहे. (वार्ताहर)
जंगल वाचविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज
By admin | Published: March 22, 2017 3:04 AM