पुणे : शासनाबरोबरच खासगी क्षेत्राच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन काय आहे, यावर देशाच्या विकासाची दिशा व गती अवलंबून आहे. मात्र, देशातील धर्म, जात, लिंग व प्रांतभेद विचारात घेऊन सर्वसमावेशक विकासाचे धोरण आखण्याची आवश्यकता आहे, असे मत इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.सिम्बायोसिस स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सच्या वतीने आयोजित ‘ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया २०३० : स्ट्रॅटॅजीस् फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोअल्स’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सुखदेव थोरात बोलत होते. कार्यक्रमास सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य प्रा. दिलीप नाचणे, संयुक्त राष्ट्रसंघाचे निवासी समन्वयक व यूएनडीपीचे भारतातील निवासी प्रतिनिधी युरी अॅफॅनासीएव्ही, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संचालिका डॉ. ज्योती चंद्रमणी आदी या वेळी उपस्थित होते.दिलीप नाचणे म्हणाले, देशातील कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत. हे बदल कामगार चळवळीला धोकादायक आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाचा विचार करताना कामगारांच्या हिताचाही विचार करावा लागणार आहे. युरी अॅफॅनासीएव्ही यांनी भारताने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती द्यावी, असे मत व्यक्त करून भारतासमोरील व जगातील इतर देशांसमोरील विकासाची आव्हाने सारखी असल्याचे नमूद केले. कार्यक्रमात डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्वसमावेशक विकास गरजेचा
By admin | Published: February 16, 2017 3:21 AM