पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली, रुपाली यांच्या परवान्यात फेरफार करून फसवणूक केलेले प्रकरण समुपदेशनासाठी पाठवायचे का, अशी विचारणा न्यायालयाने वाद असलेल्या दोन्ही बाजूंना केली आहे. यावर म्हणणे सांगण्यासाठी २२ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत या प्रकरणात कोणाला अटक करू नये, असे न्यायालयाने डेक्कन पोलिसांना तोंडी सांगितले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात जगन्नाथ होन्नई शेट्टी (रा. शिवाजीनगर) आणि शशेंद्र सुंदर शेट्टी (रा. बाणेर रोड) यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जगन्नाथ यांची मेहुणी शशिकला श्रीराम शेट्टी (वय ६३, रा. क्वार्टर गेट) यांनी फिर्याद दिली आहे. हॉटेल वैशाली आणि रुपालीचे मूळ मालक श्रीधर बाबू शेट्टी यांच्या शशिकला शेट्टी कन्या आहेत. श्रीधर शेट्टी यांना चार मुली होत्या. श्रीधर शेट्टी यांनी १९४५ ते १९५० च्या काळात निर्मल भवन, मद्रास कॅफे (जे आता रुपाली नावाने ओळखले जाते.) मद्रास हेल्थ होम (जे आता वैशाली नावाने सुरु आहे) अशी तीन हॉटेल्स सुरू केली.शशिकला सात वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे, श्रीधर शेट्टी यांचे निधन झाले. जगन्नाथ शेट्टी शशिकला यांच्या आत्याचा मुलगा आहे. जगन्नाथ वयाच्या १९व्या वर्षापासून श्रीधर शेट्टी यांच्याकडे हॉटेलमध्ये कामास होते. श्रीधर शेट्टी यांच्या निधनानंतर जगन्नाथ यांनी श्रीधर यांची पत्नी अप्पी यांना गोड बोलून, विश्वास संपादन केला. त्यानंतर हॉटेलचा सर्व कारभार स्वत: पाहण्यास सुरुवात केली. वेगवेगळी कारणे दाखवून हॉटेल नावावर करून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांची मोठी बहीण शकुंतला हिच्याबरोबर लग्न केले. त्या वेळी जगन्नाथ शेट्टी यांचे वय ३४ होते.
समुपदेशन हवे आहे का?
By admin | Published: April 21, 2017 6:06 AM