खोडद : कोविड सेंटर किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देखील सदर रुग्ण हा पॉझिटिव्ह असतो. मात्र, त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो निर्धास्त होतो. याकाळात त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील संसर्ग होण्याचा धोका असतो, हा धोका आणि कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गावागावांत विलगीकरण कक्ष निर्माण होण्याची गरज आहे, असे मत डॉ. वर्षा गुंजाळ यांनी व्यक्त केले.
खोडद येथे ग्रामविकास मंडळ व युवकांच्या पुढाकारातून येथील जगदंबा मातेच्या हॉलमध्ये विलगीकरण कक्ष नुकताच सुरू करण्यात आला आहे. या विलगीकरण कक्षाला वारुळवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सूरज वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
माऊली खंडागळे म्हणाले की, काेरोनाच्या बाबतीत अजूनदेखील म्हणावे असे गांभीर्य नागरिकांमध्ये दिसून येत नाही. प्रत्येक गावागावांत असलेल्या विलगीकरण कक्षाचा पुरेपूर वापर केला तर कोरोनाचा होणार प्रसार थांबण्यास मदत होईल. यामुळे पर्यायाने कोरोना बाधितांची संख्या कमी होणार आहे. सर्व विलगीकरण कक्ष व कोविड सेंटर बंद करण्याची लवकरच वेळ यावी यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागायला हवं.
खोडद गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष सुरू केले, ही कौतुकास्पद बाब आहे. विलगीकरण कक्षाचा वापर केल्यानंतर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर, त्या रुग्णांमुळे कोरोनाचा होणारा संसर्ग कमी होणार आहे. या विलगीकरण कक्षात जेवढ्या अधिक प्रमाणात रुग्णांची काळजी घेता येईल तेवढी घ्यावी.
पृथ्वीराज ताटे, सहायक पोलीस निरीक्षक नारायणगाव पोलीस स्टेशन
२९ खोडद
खोडद येथे ग्रामविकास मंडळ व युवकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाची डॉ.वर्षा गुंजाळ यांनी पाहणी केली.