पुणे : काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी त्याचे मूळ शोधले पाहिजे. काश्मीरमधील लोकांच्या स्वायत्तता, रोजगार, शासन या तीन मागण्या असून त्या पूर्ण होणे गरजेचे आहे. हे लोक आपलेच बांधव आहेत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी. दहशतवाद नष्ट करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करायला हवा. सैन्यदल दहशतवाद्यांना संपवू शकते; परंतु दहशतवादी विचारसरणी संपवू शकत नाही. ज्या वेळी ती विचारसरणी संपेल, त्या वेळी खऱ्या अर्थाने काश्मीर प्रश्न सुटेल, असे प्रतिपादन मेजर जनरल संजय भिडे (निवृत्त) यांनी केले. विश्वलीला ट्रस्टतर्फे एरंडवणे येथील सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या सभागृहात आयोजित भारतीय लष्कर, त्याच्या कार्यपद्धती व काश्मीर समस्या या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी नगरसेवक धीरज घाटे, दीक्षा कदम, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, संस्थेचे विश्वस्त देवव्रत बापट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विश्वलीला संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम करणाऱ्या सावली संस्थेला उपस्थितांनी मदत दिली.अमोद जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिन बर्वे यांनी प्रास्ताविक केले. रंजना बर्वे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दहशतवादाचा विचार नष्ट होण्याची गरज
By admin | Published: March 21, 2017 5:28 AM