समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटातील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये जगत आहेत. शालेय वयापासून मुलींना कराटेसारखे प्रशिक्षण देण्याची गरज आहेच; मात्र, सर्वात जास्त गरज आहे ती मुलांवर चांगले संस्कार करण्याची, स्त्रीसन्मानाचे धडे गिरवण्याची. ‘तू स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे’, ही बाब लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवण्याची गरज असते. मुलांसाठी असे वर्ग सुरू करणे, अभ्यासक्रमात याबाबतच्या शिक्षणाचा समावेश करण्याची नितांत गरज आहे.
दररोज बलात्काराची नवनवीन प्रकरणे समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडे काही ‘अॅक्शन प्लॅन’ आहे की नाही, हेच कळायला तयार नाही. अनेकदा १०० क्रमांकावर संपर्क साधला तरी फोन उचललाही जात नाही. ‘प्रतिसाद’ अॅपचे पुढे काय झाले, हे माहीत नाही. शहरात विविध ठिकाणी सुमारे १५०० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. ते कार्यरत आहेत की नाही, याबाबतही कल्पना नाही. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणांनी आता ठोस अॅक्शन प्लॅन तयार केला पाहिजे. दररोज अशा घटना घडत असतील तर त्यासंदर्भात काय पावले उचलली जात आहेत? केवळ निवेदने स्वीकारून बदल घडणार नाहीत, प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी बलात्कारांच्या प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.
कोथरूडमध्येही दररोज टेकडीवर फिरायला जाणा-या महिलांना वाईट अनुभव येतात. परवाच कोथरूडमध्ये एक ताई सकाळी ९ वाजता आपल्या लहान मुलाला घेऊन गोपीनाथनगर टेकडीवर लहान मुलाला घेऊन गेल्या असताना एका तरुणाने असभ्य वर्तन केले. अशा घटना वारंवार घडत असूनही ठोस पावले उचलली जात नाहीत. महिलांची सुरक्षितता, त्यांचा स्वाभिमान, त्यांची अस्मिता जपली जाणार आहे की नाही, असा प्रश्न पडतो. बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांपैकी किती जणांचे व्हेरिफिकेशन केले जाते, याचा आकडा पोलिसांकडे नाही. बाहेरुन आलेल्या आणि भाड्याच्या घरामध्ये राहणा-या लोकांची एकत्रित नोंद उपलब्ध नाही. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित सर्व उपाययोजना यंत्रणेकडून तातडीने झाल्या पाहिजेत. बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका, असे आवाहन अॅड. वैशाली चांदणे यांनी वकिलांना केले आहे, याबाबत मी त्यांचे अभिनंदन करते. विकृत मानसिकतेच्या लोकांना आणि यंत्रणेला ‘ती’चा गणपती सदबुद्धी देवो, हीच प्रार्थना!