बावडा : देशात आगामी गळीत हंगामात साखरेचे ३४५ लाख टन एवढे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. सध्या देशात अंदाजे ९० लाख मे. टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे शासनाकडे शेजारील चीन, बांगलादेश, इंडोनेशिया या देशांत शुभ्र साखर निर्यात करण्यासाठी अनुदानाच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावे तसेच रॉ शुगरचे धोरण लवकर ठरवावे, अशी मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा भाग्यरत्न सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या वेळी सर्व विषय एकमताने संमत करण्यात आले. पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रातही आगामी काळात ११० मे. टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशातील शिल्लक साखरेचा विचार करता नीरा-भीमा कारखाना ठराविक प्रमाणात रॉ शुगरचे उत्पादन घेणार आहे. त्यासाठी शासनाने लवकरच निर्यातीचे धोरण ठरविण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या १० सप्टेंबरला नवी दिल्लीत बैठक होणार आहे.मागील हंगामात कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन २४०० रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. साखरेचे दर घसरल्याने २२०० रुपयांचा हप्ता दिलेला आहे. कारखान्याकडे फक्त ६ कोटी रुपये भागभांडवल आहे. कारखान्याचा कारभार काटकसरीने व पारदर्शी केल्याने कारखान्याची मालमत्ता ३२९ कोटी रुपयांची झाली आहे. याप्रसंगी वार्षिक सभेचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी केले. या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, उदयसिंह पाटील, विलास वाघमोडे, मयूरसिंह पाटील, अनिल पाटील, विकास पाटील, किरण पाटील, देवराज जाधव, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, मंगेश पाटील, संग्रामसिंह पाटील, प्रसाद पाटील, दत्तात्रय शिर्के, रणजित रणवरे, सुरेश मेहेर, महादेव घाडगे, श्रीमंत ढोले, धनंजय पाटील, सतीश अनपट, अशोक वनवे, मोहन गुळवे, नागेश नष्टे उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे तर आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.केंद्र सरकारने द्यावा इथेनॉलला ५२ रुपयांचा दरकेंद्र सरकारने इथेनॉलला प्रतिलिटर ५२ रुपये एवढा दर देणे गरजेचे आहे. साखरेचा कमीतकमी विक्रीदर हा २९०० रुपयांवरून ३१०० रुपये करण्यात यावा, अशी मागणी या वेळी पाटील यांनी केली.आगामी गळीत हंगामामध्ये कारखाना सुमारे ७ लाख मे. टन उसाचे गाळप करणार आहे. या हंगामात साखर उतारा १२ टक्केचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याकरिता संगणीकृत ऊसतोडणीकार्यक्रम शिस्तबद्ध राबविणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.