पुणे : सध्याचे सरकार हे भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर संघाचे आहे. एकीकडे देश-विदेशात गांधींबद्दल बोलायचे आणि दुसरीकडे देशामधून हळूहळू गांधी संपवायचे असे प्रकार सुरू आहेत. आता आणीबाणीची वेळ आली आहे. गांधींच्या खुनाची केस घेऊन लढायचे की विचारांची? ही लढाई नथुराम विरोधातली नाही तर त्यामागे असलेल्या विचार आणि प्रेरणेची आहे. गांधी विचारांची केस लढण्याची गरज आहे, असे परखड विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांनी व्यक्त केले. विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने विनायक होगाडे लिखित ‘ओह माय गोडसे’ या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रसिद्ध कायदे अभ्यासक असीम सरोदे, प्रकाशक मनोहर सोनावणे आणि लेखक विनायक होगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष वारे यांनी भूषविले. गांधींबद्दल कपोलकल्पित कथा सांगितल्या जात असून, गोबेल्स नीती म्हणजे त्यांच्याबद्दलच्या खोट्या गोष्टी कशा खºया आहेत हे जनतेच्या मनावर वारंवार बिंबवून त्यांना सातत्याने मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून रझिया पटेल म्हणाल्या, हिंदुतत्ववाद्यांना सामाजिक न्याय, समता, एकात्मकता, धर्मनिरपेक्षता, यावर काम करणारेी लोक शत्रू वाटत असून, त्यांना संपविले जात आहे. नथुराम जरी संपला असला तरी त्यामागची प्रवृत्ती संपलेली नाही. पालकांना आपण कशाच्या बदल्यात काय देतोय हे कळलं नाही तर नथुराम तयार होत राहातील. लेखक विनायक होगाडे आणि सुभाष वारे यांनीही मनोगत व्यक्त केले...........गांधी आपल्या काळातील मोठं वास्तव आहे. गांधी आणि आंबेडकर यांचा हात सोडल्यामुळे गांधी अनाथ झाल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे भाजप गांधी हायजॅक करत आहेत. वृत्तवाहिन्यांनी महात्मा गांधी नायक की खलनायक हा कार्यक्रम करावा. जेवढे ते खलनायक सांगितले जातील. तेवढे ते नायक म्हणून पुढं येतील. गांधी कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. गांधी विचार टाकून दिला तर अस्मितेच्या आधारे हिंसाचाराची स्थिती उदभवू शकते. त्यामुळे आता राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी संतस्वरूपात नव्हे तर क्रांतिकारी रूपात पुढे आणण्याची गरज आहे. - अँड असीम सरोदे ........
गांधी विचारांची ‘केस’ लढण्याची गरज डॉ. रझिया पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:18 PM
ही लढाई नथुराम विरोधातली नाही तर त्यामागे असलेल्या विचार आणि प्रेरणेची आहे.
ठळक मुद्दे ‘ओह माय गोडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन