राजगुरुनगर : ‘‘आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मराठी भाषेचे रूप झपाट्याने बदलत असल्यामुळे मौखिक परंपरेतील ओवीसारखे छंदातील लोकवाङ्मय खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचे जतन करणे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. संतोष पवार यांनी केले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘रंग कवितेचे’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कला विभागप्रमुख डॉ. ए. एम. पवार, कवी संतोष गाढवे, प्रा. किशोर लांडे-पाटील, प्रा. एम. एल. मुळूक, प्रा. धनंजय वाघ, प्रा. किरण गाढवे, प्रा. वर्षा कांबळे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.जगण्याला लय असली, की कविता ओठात येते आणि आपल्याशी नाते जोडते. त्यासाठी लयीला शब्दांची जोड हवी, असे सांगून पवार यांनी त्यांच्या ग्रामीण भागातील स्त्रियांचे दु:ख मांडणाऱ्या कविता सादर केल्या. ‘माहेराला माती होती, सासरला माती माती, माती जन्माची सोबती’ ही स्त्रीचे मातीशी नाते सांगणारी कविता त्यांनी सादर केली. तसेच, वधूपित्याची भावना मांडणारी ‘पदर आलेली कन्या, पदरमोड करून, तुमच्या पदरात घातली’ ही कविता सादर केली. गावातील मुलगी पाण्याला जाताना तिच्यावर जो अतिप्रसंग घडला; त्यामुळे तिचे जीवन उद्ध्वस्त झाले, याचे चित्रण करणारी कविता ‘गावात पोर पाण्याला गेली, वाटेत गुंडा टाकून आली, धुळवडीचा दिवस होता, रंगात पोर माखून गेली’ ही कविता उपस्थितांना हेलावून गेली. शेवटी त्यांनी आपल्या आईबद्दलची ‘माय होतीच टसली, जशी चुलीची धसली, अशी जळली घरात, नाही धुराने धुपली’ अशी भावना व्यक्त करणारी कविता सादर करून मातृशक्तीचे महत्त्व सांगितले.
लोकवाङ्मयाचे जतन करणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 1:03 AM