पिंपरी : औद्योगिकीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरात लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे चांगले जाळे असल्याने येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पिंपरी - चिंचवड शहरातील चिंचवड हे मध्यवर्ती स्थानक आहे. परंतु, लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या येथे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे, लोणावळा, कल्याण या ठिकाणी उतरुन पुढील प्रवास करावा लागत आाहे. पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेसला जादा बोगी असण्याची गरज आहे. पिपंरी व चिंचवडसाठी सद्या एकच बोगी आहे. ती पिंपरी व चिंचवडसाठी स्वतंत्र असण्याची गरज आहे. पिंपरी व चिंचवडसाठी बोगी एकत्र असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबई - कोयना एक्सप्रेस २१ डब्यांची आहे. त्यात गर्दी होत आहे. डब्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या स्थानकांचा विकास होण्याची गरज आहे. मुंबई-चेन्नई एक्सप्रेस, लोकमान्य टिळक ते हुबळी एक्सप्रेस, पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस (पुणे-सोलापूर), मुंबई - लातूर एक्सप्रेस, अजमेर एक्सप्रेस, मुंबई - बेंगलोर एक्सप्रेस, अहिंसा एक्सप्रेस (पुणे- अहमदाबाद), डेक्कन एक्सप्रेस (मुंबई-पुणे), प्रगती एक्सप्रेस (पुणे-मुंबई) या गाड्या चिंचवड स्थानकावर थांबण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)चिंचवड ते रोहा रेल्वेमार्गाची नुसतीच घोषणा चिंचवड ते रोहा ९० किलोमीटर रेल्वे मार्गाची घोषणा तत्कालीन रेल्वे राज्यमंत्र्यांनी १९९६ ला केली होती. हा मार्ग हिंजवडी , पौड, मुळशी, बोरिवली, हेतवण, कोलाड, रोहा असा करण्यात येणार होता. त्यात २५ लहान व मोठे बोगदे, १०३ छोट्या बोगद्यांचा समावेश होता. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊनही या मार्गाच्या कामास सुरुवात होऊ शकली नाही. ती फक्त घोषणाच राहिली. शहरातील प्रत्येक स्थानकानुसार प्रवासी समितीची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत रेल्वे गाड्यांची व डब्यांची संख्या वाढत नाही. लोकलच्या फेऱ्यांत वाढ होण्याची गरज आहे. अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे व पिंपरी - चिंचवड शहराच्या दृष्टीने चिंचवड स्थानकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचवड स्थानकाचा विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणे गरजेचे आहे.- गुलामअली भालदार, अध्यक्ष, प्रवासी संघ, चिंचवड
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र डबे वाढविण्याची आवश्यकता
By admin | Published: February 23, 2016 3:12 AM