पिंपरी : राफेल कराराबाबत भाजपाचे पदाधिकारी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिंडोरा पिटून बालीशपणे उत्तरे देत आहेत. विमानांची वाढलेली किंमत आणि अनिल अंबानी यांच्या कंपनीबरोबर केलेल्या कराराची माहिती सर्वोच्च न्यायालय आणि संसदेपासून लपवून ठेवली आहे. या कराराबाबत झालेल्या भ्रष्टाचारावर आणि चुकांवर पांघरूण घालण्याचा हा प्रकार आहे. याची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पिंपरीत केली.पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद झाली. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते. भाजपा सरकारवर टीका करताना महाजन म्हणाले, ‘‘आघाडी सरकारच्या काळात राफेल करारात १२६ विमाने एक विमान ५२६ कोटी रुपये याप्रमाणे ठरले होते. यापैकी ३६ विमाने प्रत्यक्ष फ्रान्समधील कंपनीतून व उरलेली हिंदुस्थान एरोनॉटिक्सला तंत्रज्ञान देऊन भारतात त्यांची निर्मिती करण्याचे नियोजन होते. भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुसऱ्याच महिन्यात हा करार रद्द करून कंपनीशी वाटाघाटी केल्या.दोन महिन्यांनंतर पंतप्रधानांनी फ्रान्सचा दौरा करून एक विमान सोळाशे कोटी रुपयांना खरेदी करण्याचा नवीन करार केला. पंधरा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या आणि ४५ हजार कोटी रुपये कर्ज असलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला बरोबर घेतले. कराराबाबत भाजपामधूनच बाहेर पडलेल्या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीच्या वेळी सरकारने न्यायालयाची, संसदेची तसेच देशातील जनतेची फसवणूक करून खोटी माहिती सादर केली. संयुक्त संसदीय समितीसमोर याबाबतचा अहवाल सादर केला नसतानाही अहवाल दिला असल्याचे न्यायालयात सांगितले. समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी खरी माहिती उघडकीस आणली. तेव्हा भाजपाने काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी भाजपाचे पदाधिकारी दिशाभूल करीत आहेत. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी.एमआयएमशी युती नाहीचप्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या युती बाबत विचारले असता महाजन म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणाºया सर्व पक्षांनी एकत्र यावे व हुकूमशाही विरोध लढा उभारावा, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. एमआयएमसह चर्चा होणे अशक्य आहे. मनसेबाबत काँग्रेसची काहीच भूमिका नाही.’’
संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून राफेलची चौकशी करण्याची आवश्यकता - रत्नाकर महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 1:08 AM