पुणे : ‘‘पत्रकारिता ही समाजहिताची असावी. समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे. ध्येयवादी पत्रकारिता करणाऱ्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देऊन त्यांना समाजासमोर आणण्याची अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. तसेच वृत्तपत्राचे स्वरूप काळानुरूप बदलत असून, ते आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे असेही ते म्हणाले. वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वरुणराज भिडे पुरस्कार वितरणाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या वेळी ‘लोकमत’चे बातमीदार- उपसंपादक सुनील राऊत यांचा वरुणराज भिडे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार अनंत बागायतकर, गुरुबाल माळी आणि सरिता कौशिक यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. समीर वैरागी आणि शिल्पा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विलास जोशी, अंकुश काकडे, डॉ.सतीश देसाई आणि शैलेश गुजर उपस्थित होते. पवार म्हणाले, पत्रकारिता ही समाजहिताचीच असली पाहिजे. कालपरत्वे वृत्तपत्रांमध्ये कमालीचे बदल झालेले आहेत. पहिल्या पानावर ज्या दिवसभरातल्या घडामोंडीवर आधारित ठळक बातमी दिसली पाहिजे ती दिसत नाही. हे बदल आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच अशा बदलांना सामोरे जाण्याची शक्ती मिळेल. या वेळी उदय निरगुडकर आणि पुरस्कार विजेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. नव्या लोकांनाही मार्गदर्शन करा...उल्हास पवार यांनी १९६७ मध्ये शरद पवार यांना निवडणुकीमध्ये मदत केली होती, म्हणून ते निवडून आले होते, असा चिमटा पवारांना काढला. त्यावर उदय निरगुडकर यांनी २0१४ मध्ये जर अशीच मदत केली असती तर अशी परिस्थिती उद्भवली असती का? अशी टिप्पणी उल्हास पवारांना उद्देशून केली, त्यावर ऐकून घेतील ते शरद पवार कसले! त्यांनीही मग आता निवडणुकीत नव्या लोकांना सहकार्य करावे, तसेही आता ’ते’ रिकामेच आहे, अशा शब्दातं उल्हास पवारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. निवडणुकीत कसा आलो... पवारांनी केला गौप्यस्फोटराजकारणात येण्यामागचे महत्त्वाचे कारण कोणते असेल ते म्हणजे ’दूध’ असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. सकाळी उठून चहा आवडत नसल्यामुळे दूध प्यावे लागायचे. ते प्यावे लागू नये म्हणून लवकर बाहेर पडायचो. त्यातून सवंगडी जमत गेले. ज्यावेळी १९६७ मध्ये पहिली निवडणूक लढविली, त्या वेळी मत मागण्यासाठी लोकांच्या दारी जायचो. महिला चहाचा कप आणून द्यायच्या पण चहा पित नसल्याने ‘नको’ म्हणत असे. त्यावर आमच्या हातचा चहा पित नाही तर आमच्यासाठी काय काम करणार? असे तोंडावर महिला सुनवायच्या. राजकारणात आल्यावर सवयी बदलल्या. पण त्यानंतर कधी कुणाच्या दारावर मतं मागायला गेलो नाही असे पवारांनी सांगितले.
पत्रकारिता समाजहितासाठी हवी : शरद पवार
By admin | Published: April 25, 2015 11:01 PM