पुणे : ‘पुण्यात यापुढे नव्या ॲमेनिटी स्पेस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे उपलब्ध ॲमेनिटी स्पेसचा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वापर केला पाहिजे. त्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन ठेवून नियोजनाची आवश्यकता आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी राजकीय इच्छाशक्तीने एकत्रित येऊन धोरणे निश्चित करावीत, असे मत विविध क्षेत्रातील धोरणकर्त्यांनी आज येथील चर्चेत व्यक्त केले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रास खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, सीओईपीचे प्रताप रावळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाने व या क्षेत्रातील इतर अभ्यासक उपस्थित होते. क्लब ऑफ इन्फ्लुएन्सर पुणेच्यावतीने चर्चेचे आयोजन केले.
‘ॲमेनिटी स्पेससारख्या शहर विकास धोरणात राजकीय पदाधिकाऱ्यांपेक्षा नोकरशाहीचा दोष अधिक आहे,’ असे मत मांडताना झगडे म्हणाले, ‘ॲमेनिटी स्पेस शहराच्या विकास आराखड्याचा भाग आहे. तेथील आरक्षण नोकरशाहीने राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे.’
खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘नागरिकांना पुरेशा सुविधा मिळाव्यात म्हणून जागांवर आरक्षण दिलेले असते. भविष्यात जागा वाढणार नसल्याने उपलब्ध जागेचे योग्य पद्धतीने सरंक्षण केले पाहिजे. ॲमेनिटी स्पेसचा सर्व्हे करून त्याचा मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे. हवामान बदलासारख्या आव्हानाला सामोरे जाताना अधिकाधिक मोकळ्या जागा आवश्यक आहेत. हे सर्व बदल आणि भविष्याची मागणी लक्षात घेऊन ॲमेनिटी स्पेसचे नियोजन केले पाहिजे. पुण्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून, ॲमेनिटी स्पेसवर अर्बन फॉरेस्ट विकसित करण्याची आवश्यकता आहे.’
‘शहरात गेल्या वीस वर्षांत ८५६ पैकी ५८६ ॲमेनिटी स्पेस विकसित झाल्या आहेत,’ असे सांगत बिडकर म्हणाले, ‘आजपर्यंत विकसित झालेल्या ॲमेनिटी स्पेसचे काय झाले, याची पाहणी करून उर्वरित ॲमेनिटी स्पेस वाचविण्याचा आमचा उद्देश आहे, त्या विकायचा उद्देश कधीच नव्हता. ॲमेनिटी स्पेसचा गेल्या वीस वर्षँत आराखडा तयार झालेला नाही. आता या जागांचा दुरूपयोग थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. उरलेल्या २७० ॲमेनिटी स्पेस वाचविण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.’
यावेळी आमदार शिरोळे यांनी धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीत सर्व घटकांच्या समन्वयाच्या आवश्यकतेचा मुद्दा मांडला, तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पुणेचे प्राध्यापक डॉ. प्रताप रावळ यांनी विकास आराखडा आणि ॲमेनिटी स्पेस याबाबत केलेल्या पाहणीचे निष्कर्ष मांडले. आम आदमी पक्षाचे मुकुंद कीर्दत यांनी विकासाची संकल्पना नेमकी काय असावी, यावर चर्चेची आवश्यकता असल्याचे सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सामान्य नागरिकांना सुविधा मिळायलाच हव्यात; पण सुविधांची आर्थिक निकषांवर वर्गवारीही व्हावी. ॲमेनिटी स्पेसचीही वर्गवारी मांडली पाहिजे. ठाणे, मुंबईतही ॲमेनिटी स्पेसचा काय उपयोग होतो, याचाही आढावा घेऊया आणि पुण्याच्या विकासासाठी नागरिकांच्या गरजांनाच प्राधान्य देऊन निर्णय घेऊया. राज्य सरकारने पाच एकराच्या आतील जागांबाबत घेतलेल्या धोरणात काही बदल, सूचना असतील तर, त्यांचाही विचार करण्यात येईल. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू.' विनोद सातव यांनी क्लबची संकल्पना स्पष्ट केली.