पुणे : महत प्रयासानंतर आपण हरितक्रांतीपर्यत पोहचलो. वाटेतील अडचणींचा सामना करत शेती आणि शेतकरी यांना फायदेशीर काय आहे, हा विचार जास्त महत्वाचा आहे. आता सातत्याने कृषीक्षेत्रात प्रयोग होत आहेत. या प्रयोगाच्या निष्कर्षांपर्यंत पोहचल्यावर त्याच्या अंमलबजावणी करण्याकरिता राजकीय इच्छाशक्तीची देखील गरज आहे. असे ख्यातनाम कृषीतज्ञ -संशोधक आणि हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशातील शेतीसमोर असणा-या विविध आव्हानांचा आढावा घेतला. ते म्हणाले, देशातल्या कृषीव्यवस्थेचे चित्र बदलायचे असल्यास त्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज आहे. बदलते हवामान, दुष्काळाची भीती, पुरसदृश परिस्थिती आणि बाजारपेठ व्यवस्थापन आदी गोष्टींचे आव्हान शेतक-यांपुढे असून त्यांनी सातत्याने याबाबत विचार करणे महत्वाचे आहे. केवळ आकर्षक कृषीयोजना असणे फारसे उपयोगाचे नाही. कृषीबाजारपेठेतील शेतक-याचे महत्व वाढण्यासाठी आवश्यक ते बदल स्वीकारण्याची तयारी सरकारने दाखवायला हवी. कृषीक्षेत्रात मोठया प्रमाणावर प्रयोग होत असून त्याचा फायदा देखील शेतक-यांना होतो आहे. मात्र, तितकेच पुरेसे नसून त्या प्रयोगांची अंमलबजावणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. आपला प्रवास ग्रीन टू इव्हरग्रीन रिव्हॉल्युशन असा सुरु असून सध्या आपण जेनिटीक मॉडिफिकेशनच्या उंंबरठ्यावर आहोत.* आकडेवारी, समर्पक उदाहारणे डॉ.स्वामीनाथन यांनी अतिशय अभ्यासुपणाने आपले विचार व्यक्त करताना ते पटवून देण्यासाठी विविध संदर्भग्रंथ, संकेतस्थळे, स्थळ सर्वेक्षण अहवालांचा दाखला दिला. वयाची ९२वर्षे पूर्ण करणा-या डॉ. स्वामीनाथन यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सभागृहात शांतता होती. देशाविदेशातील शास्त्रज्ञ, त्यांचे प्रबंध, संशोधन, कार्य, याविषयीची माहिती, जगभरात शेतीविषयक चाललेले संशोधन, नीती आयोग, आयोगाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेली आकडेवारी, देशांमधील वेगवेगळ्या राज्यांमधील सद्यस्थितील शेतीची परिस्थिती याचे सादरीकरण डॉ. स्वामीनाथन यांनी केले.
कृषीसंशोधनात राजकीय इच्छाशक्तीची गरज : डॉ.एम.एस.स्वामीनाथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 8:13 PM
कृषीबाजारपेठेतील शेतक-याचे महत्व वाढण्यासाठी आवश्यक ते बदल स्वीकारण्याची तयारी सरकारने दाखवायला हवी.
ठळक मुद्देनुसतेच प्रयोग नकोत, ’’ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर’’ विषयावर मार्गदर्शन कृषीक्षेत्रात मोठया प्रमाणावर प्रयोग होत असून शेतक-यांना त्याचा फायदा