पुणे : “आपला देश, देव, धर्म आणि श्रद्धा यांच्यावर
परकीय हस्तक जाणीवपूर्व आघात करत आहेत, ते रोखण्याची
नितांत गरज आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी
सांगितल्याप्रमाणे साधना, सेवा, उपासना आणि देशनिष्ठा यांचा
संस्कार झालेल्या पिढ्या घडवल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन
ह.भ.प. चारूदत्त आफळे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख
वक्ते म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण
गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व प्रदीप
नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव
सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे
अध्यक्ष विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे,
साहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी यावेळी उपस्थित होते.
“युवकांमध्ये स्वाभाविकपणे चेतना असते, ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी पालक
आणि शिक्षकांची आहे. मुलांना, काय करू नको हे सांगण्यापेक्षा
त्यांनी नेमके काय केले पाहिजे हे सांगितले पाहिजे.
नकारात्मक विचार देण्यापेक्षा सकारात्मकता शिकविण्याची
गरज आहे. स्वामी विवेकानंदांना लहानपणी असलेले घोडागाडीच्या गाडीवानाचे
आकर्षण लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी, भगवान
श्रीकृष्णासारखा सारथी होण्याचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवला
होता. रामकृष्ण परमहंस यांनी देखील साधनेबरोबरच
त्यांच्या आवडीचे खेळ सुरू ठेवायला त्यांना सांगितले होते. अशा
शिकवणुकीमुळे देशातल्या हजारो युवकांना प्रेरणा देणारे स्वामी
विवेकानंद घडले,” असे आफळे म्हणाले.
एअर मार्शल गोखले (निवृत्त) यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, स्वामी
विवेकानंदांनी अनेक संस्थानांमध्ये विखुरलेल्या आपल्या देशाची
नाळ जोडली. ते भारताचे सांस्कृतिक राजदूत होते. राजीव सहस्रबुद्धे
यांनी प्रास्ताविक केले. मिनोती दामले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ व्हनकटे यांनी आभार मानले.