पुणे : सध्या काही गटांचा विचित्र वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी, धर्माला वेगळ्या दृष्टीने पाहणारे, प्रखरवादी, शिस्तबद्ध, भाषाप्रभू स्वातंत्र्यवीर सावरकर पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत सद्सद्विवेकबुध्दीने सावरकर समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे मत लेखक-दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर ही व्हॉट्सअॅपद्वारे दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण फर्ग्युसन महाविद्यालयातील अॅम्फी थिएटर येथे करण्यात आले होते. विविध गटातील विजेत्या स्पर्धकांमधून ओजस जोशी याची महाविजेता म्हणून निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, सुशील जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय बर्वे, रणजीत नातू, अमेय कुंटे, प्रवीण गोखले, शैलेश काळकर, अभिनेते सुनील अभ्यंकर, कॅप्टन नीलेश गायकवाड उपस्थित होते. उदय माहुरकर म्हणाले, सावरकर हे महान भविष्यवक्ता होते. जोपर्यंत पाकिस्तान आहे तोपर्यंत भारत सुखाने झोपू शकणार नाही, असे त्यांनी तेव्हाच सांगितले होते. सामाजिक स्तरावर विभाजन झाले की भौगोलिक स्तरावर देखील विभाजन होणार, हे माहीत असल्यानेच त्यांचा विभाजनाला कायम विरोध होता. सध्याच्या परिस्थितीत सावरकरांच्या बिनशर्त राष्ट्रवादाचा अवलंब केला पाहिजे. स्पर्धेत विविध गटांमध्ये सोहम कुलकर्णी, स्वप्नजा वालवाडकर, मधुरा घोलप, मेजर मोहिनी कुलकर्णी, नितीन पटवर्धन, विनय वाटवे, शेखर माळवदे, जाई ठाणेकर, आदि माळवदे यांनी यश मिळवले. स्पधेर्तील मागील व यावर्षीच्या स्पर्धकांची भाषणे मी सावरकर या यु-ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज : प्रवीण तरडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 5:48 PM
हिंदुत्ववादी, धर्माला वेगळ्या दृष्टीने पाहणारे, प्रखरवादी, शिस्तबद्ध, भाषाप्रभू स्वातंत्र्यवीर सावरकर पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देदृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण