पुणे : रात्रशाळांमधील १४५६ शिक्षक तडकाफडकी काढून घेऊन वर्ष उलटले तरी अद्याप रात्रशाळांमध्ये पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. अर्धवेळ हंगामी स्वरूपाच्या शिक्षकांची भरती करण्यास मान्यता द्यावी यासाठी शिक्षण संचालक, उपसंचालक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याला मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांअभावीच रात्रशाळा चालत असल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत. शासनाने रात्र शाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या १४५६ शिक्षकांची सेवा शासनाने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाव्दारे संपुष्टात आणली. त्यानंतर त्या जागांवर लगेच शासनाने पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र त्यावर काहीच कार्यवाही शासनस्तरावरून होताना दिसत नाही. सध्या शासनाकडून शिक्षक भरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे. रात्र शाळांमधून शिक्षक काढून घेतल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रात्र शाळेमध्ये समायोजन केले जाईल असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात त्यानुसार अंमलबजावणी झालीच नाही. शाळा अडचणीत येऊ नयेत यासाठी हंगामी स्वरूपाच्या शिक्षक भरतीला परवानगी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. याबाबतचे इतिवृत्तही उपलब्ध आहे. त्याची प्रत तत्कालीन उपसंचालक दिनकर टेमकर, मिनाक्षी राऊत, संचालक गंगाधर म्हमाणे यांना देऊनही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे ते काहीच करीत नसल्याने रात्र शाळेच्या शिक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाच्या टोलवाटोलवीचा फटका रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांचे शिक्षकच नसल्याने याचा अभ्यास कसा करायचा याचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. मात्र रात्र शाळांमधील शिक्षक काढून घेण्यात आल्याने त्या जागी हंगामी अर्धवेळ शिक्षक भरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती रात्र शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत उपसंचालकांकडे एक वर्षापूर्वी केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी उपसंचालकांना पत्र पाठवून याबाबत काय निर्णय घ्यायचा याचे मार्गदर्शन मागितले. त्यानंतर उपसंचालकांनी संचालकांकडे तर संचालकांनी आयुक्तांकडे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे शिक्षण आयुक्तांनी शिक्षण सचिवांमध्ये याबाबत काय निर्णय घ्यायचा याचे मार्गदर्शन मागितले आहे. या पत्रव्यवहाराला वर्ष उलटून गेले तरी अद्याप निर्णय घेण्यात आलेली नाही.
.............
शिक्षकांची तातडीने भरती करावी रात्रशाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रात्र शाळांमध्ये हंगामी शिक्षक भरती करण्यास परवानगी दिली जावी असा निर्णय घेतला होता. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाईट स्कूलकार्यवाही सुरू आहे रात्रशाळांमध्ये हंगामी शिक्षक भरती करण्यास मान्यता देण्याबाबत संचालकांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यांचा अभिप्राय प्राप्त झाला असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. - मिनाक्षी राऊत, प्रभारी शिक्षण उपसंचालक