\Sलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय भारताचा विकास होणार नाही. तसेच विविध क्षेत्रातील आयात कमी करणे व निर्यात वाढवणे हे देखील सर्वंकष विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. दिशादर्शक योजना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राबवून देशातील तरूणाई आणि कुशल मन्युष्यबळाला बरोबर घेवून सुखी, संपन्न, संमृध्द आणि शक्तीशाली भारत आत्मर्निभर घडवता येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केला.
सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावरील व्याख्यानात गडकरी बोलत होते. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका व प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, सिंबायोसिस इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे (एसआयबीएम) संचालक डॉ. रामकृष्णन रमण उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध स्थरावर उपाययोजना राबविल्या जात आहे. देशात बांबू उद्योगाला चालना दिली जात असून वृत्तपत्रासाठी लागणारा कागदही भारतात तयार व्हावा. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील दोन वर्षात बॅटरीवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर वाढलीत. त्याचप्रमाणे नागपूर येथे प्रकल्प उभा करून महाराष्ट्रात ब्रॅडगेज मेट्रोचे जाळे उभे केले जाणार आहे.
ग्रामीण, आदिवासी भागातून शहरी भागाकडे लोकांचे होणारे स्थलांतर हा एक चिंतेचा विषय असून विकासाचे विकेंद्रीकरण झाल्यास सर्वठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरात लोकसंख्या वाढीमुळे इतर समस्या उद्भवणार नाहीत. देशात कमतरता असलेल्या गोष्टींची निर्मिती उत्पादन करणे व अधिक प्रमाणात असलेल्या गोष्टींची गुणवत्ता सर्वतोपरीने वाढवून त्यांची निर्यात करणे हे सर्वसमतोल विकासासाठी आवश्यक आहे.
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी देशातील शैक्षणिक क्षेत्राने देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आत्मनिर्भर बनावे अशी अपेक्षा आपल्या मनोगतात व्यक्त केली. डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रजनी गुप्ते यांंनी आभार मानले.
--
सर्व क्षेत्रातील लोकांच्या सहभागाशिवाय आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकणार नाही. तसेच आत्मनिर्भरतेसाठी देशातील नवीन पिढीला भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा आणि भक्तिमागार्तून संस्कार, म्हणजेच मूल्याधिष्ठित जीवन पध्द्ती शिकवण्याची गरज आहे, असेही गडकरी म्हणाले.