लोकमत न्यूज नेटवर्कपिरंगुट : सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढते शहरीकरण व वाढत्या नागरीकरणामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सुखसुविधा निर्माण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी व गैरकृत्यदेखील वाढल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या संकल्पनेतून ‘एक गाव-एक सीसीटीव्ही कॅमेरा’ बसविण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर यांनी पिरंगुट (ता. मुळशी) येथे नुकतीच औद्योगिक वसाहतीमधील असलेल्या सर्व कंपनीच्या मालकांची व त्यांच्या प्रतिनिधींची त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक घेऊन मुळशी तालुक्यातील सर्व गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले.त्याचप्रमाणे या बैठकीला उपस्थित असलेले मुळशी तालुक्याचे माजी सभापती बाळासाहेब पवळे व नाथा राऊत यांनी १० ते १५ गावांमध्ये त्यांच्या प्रयत्नांतून प्रत्येकी सीसीटीव्ही बसविण्याचे घोषित केले.मुळशी तालुक्यातील असलेल्या गावांसाठी व तेथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पौड पोलीस स्टेशनतर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला औद्योगिक वसाहतीमधील असलेल्या एकूण कंपनीपैकी वेगवेगळ्या कंपनीचे ८० प्रतिनिधी हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांनी केले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, हवालदार अब्दुल शेख,शिपाई विनोद चोभे, मयूर निंबाळकर आदी उपस्थित होते. पिरंगुट येथील अनंथा रेसिडेन्सी या ठिकाणी माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली पौड पोलीस स्टेशन अंतर्गत मुळशी तालुक्यातील असलेल्या औद्योगिकवसाहती मधील सर्व कंपनीचे मालक व प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी देहूरोड यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ग्रामपंचायतीला म्हणजेच त्या ग्रामपंचायतीच्या गावाला आपण एकतरी गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. सामाजिक बांधिलकी जपत त्या बैठकीत उपस्थित असलेल्या अनेक कंपनीच्या प्रतिनिधींपैकी एकूण १७ कंपन्यांनी एक एक गाव दत्तक घेऊन सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे घोषित केले.
गावोगावी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज
By admin | Published: May 24, 2017 3:57 AM